Beed Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सोबत, पक्षाध्यक्ष शरद पवारांशी एकनिष्ठ असल्याने डॉ. नरेंद्र काळे यांना पक्षाकडून आगामी लोकसभेची उमेदवारी मिळणारच, असा आत्मविश्वास आहे. महिनाभरापासून भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या अपयशाचा पाढा वाचत ‘बीडला हवा चेहरा नवा’चा नारा देत त्यांनी जिल्हाभरात भेटीगाठींचे सत्र सुरू केले आहे.
डॉ. नरेंद्र काळे हे पेशाने दंतशल्यचिकित्सक आहेत. त्यांनी अंबाजोगाईच्या नगरपालिका क्षेत्रात दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. अंबाजोगाई नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी दोन वेळा काम केले. त्यांनी पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राजकारणात उडी घेतली. विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत ते नोंदणीकृत पदवीधरांमधून सर्वाधिक मतांनी विजयी झाले. सध्याही ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेचे सिनेट सदस्य आहेत. याच काळात महाराष्ट्र राज्य दंत परिषदेच्या संघटनेतही सक्रिय होत डॉ. नरेंद्र काळे महाराष्ट्र राज्य दंत परिषेदेचे अध्यक्ष झाले.
दरम्यान, मागील 10 वर्षांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यपातळीवर संघटनेत आपला राबता वाढवला. पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविली. 2013 ते 2022 असे नऊ वर्षे ते या पदावर कार्यरत होते. या पदाच्या माध्यमातून त्यांनी आपत्ती काळात पक्षाचे कोल्हापूरसह कोविड काळात राज्यभर विविध ठिकाणी कामे केली. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना आता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून संधी मिळाली आहे. Loksabha Election 2024
डॉ. नरेंद्र शोभा हिरालाल काळे
30 मे 1980
बीडीएस
डॉ. नरेंद्र काळे ( Dr Narendra Kale ) यांचे वडील डॉक्टर होते. त्यांच्या बालपणीच वडील डॉ. हिरालाल यांचे अपघातात निधन झाले. त्यांचे वडील हे ढोकी (ता. जि. धाराशिव) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी होते. दुचाकीवरून गावी येत असताना त्यांचा अपघात झाला होता. इस्थळ (ता. केज, जि. बीड) येथील दलितमित्र नारायणदादा काळदाते (डॉ. बापूसाहेब काळदाते यांचे बंधू) हे त्यांचे आजोबा. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे बालपण आजोळी काळदाते कुटुंबातच गेले. नंतर त्यांच्या मातोश्री शोभा यांनी बीएड केले. त्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारून त्यांनी डॉ. नरेंद्र यांच्यासह त्यांच्या भावंडांचे पालनपोषण केले. डॉ. नरेंद्र काळे यांच्या पत्नी डॉ. हर्षा काळे याही डेंटिस्ट आहेत. डॉ. नरेंद्र यांचे एक बंधू सुहास हे अभियंता असून नोकरीनिमित्त ते इंग्लंडमध्ये राहतात. दुसरे बंधू डॉ.सुदीप हे मुंबईत वास्तव्यास आहेत.
डेंटिस्ट
डॉ. नरेंद्र काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी, युवक आघाडीत त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून आठ वर्षे त्यांनी काम पाहिले. ते या आघाडीचे नऊ वर्षे प्रदेशाध्यक्ष होते. सध्या राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट (अधिसभा) निवडणुकीत पदवीधर मतदारांमधून ते सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. अंबाजोगाई नगरपालिकेचे ते दोनवेळा स्वीकृत सदस्य राहिले आहेत. डॉ. काळे यांना विद्यार्थीदशेपासूनच राजकारणाची आवड असल्याने ते चळवळीत सक्रिय होते. घरात राजकीय वारसा नव्हता, मात्र आजोबा डॉ. बापूसाहेब काळदाते यांचा राजकीय वारसा त्यांच्याकडे आला आहे.
डॉ. नरेंद्र काळे यांनी नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थिक मदत केली आहे. ते बनसारोळा (ता. केज. जि. बीड) येथील श्री बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव असून त्या माध्यमातून ग्रामीण भागात शैक्षणिक कामात योगदान दिले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या (बीड) माध्यमातून 2016 च्या दुष्काळात गाळ काढणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन अभियान राबवले होते. कोरोनाच्या काळात त्यांनी बनसारोळा येथे संस्थेच्या वतीने कोव्हिड सेंटरची उभारणी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी दुष्काळात चार महिने त्यांनी मोफत भोजन उपलब्ध करून दिले होते. रोटरी क्लब, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ, पर्यटन विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले.
डॉ. नरेंद्र काळे यांचे हे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर तसेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियावर सक्रिय असतात. केलेली विविध कामे, भेटी, संवाद यांचे फोटो व व्हिडीओ ते पोस्ट करतात.
राष्ट्रवादी काँग्रेसेचे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांचा जिल्हाभर संपर्क आला. या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व आता प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते काम पााहत आहेत. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यात संपर्क आहे. अलीकडे त्यांना लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळणारच, असा आत्मविश्वास असल्याने मागील दोनेक महिन्यांपासून त्यांनी संपर्क अधिक वाढवला आहे. पक्षासह समविचारी पक्ष व समविचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची ते नियमित भेटी घेत आहेत.
मागच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा प्रचार केला होता. निष्ठा बदलणाऱ्यांना मतदार धडा शिकवतील, असे वक्तव्य त्यांनी त्यावेळी केले होते.
दिवंगत डॉ. बापूसाहेब काळदाते, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार दिवंगत वसंतराव काळे, माजी मंत्री दिवंगत विमलताई मुंदडा.
डॉ. नरेंद्र काळे उच्चशिक्षित व दिवंगत बापूसाहेब काळदाते यांच्या कुटुंबाशी निगडीत आहेत. विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून करत असल्याने त्यांचा तरुणांशी चांगला संपर्क आहे. नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी ते गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थिक मदत करतात. श्री बनेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यातून शिक्षणक्षेत्रात कार्यरत आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सामाजिक कामात त्यांचा पुढाकार असतो. कोरोना काळात बनसारोळा येथे संस्थेच्या वतीने कोविड सेंटरच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम केलेले आहे. दुष्काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना चार महिने मोफत भोजन उपलब्ध करून दिले. रोटरी क्लब, यशवंतराव चव्हाण सेंटर च्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ, पर्यटन विकास साठी प्रयत्नरत आहेत. अंबाजोगाईच्या पर्यटनासंदर्भात पुस्तिका प्रकाशित केले.
डॉ. नरेंद्र काळे यांना मोठ्या निवडणुकीचा अनुभव नाही. उलटपक्षी सध्या त्यांचा पक्ष बॅडपॅचपमधून जात आहे, तर विरोधातील भाजपला राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाची साथ आणि सत्ता दोन्ही आहे. लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना सोबत घेणे, बूथनिहाय नियोजन अशी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. त्यांच्याकडे व्यक्तीगत कार्यकर्त्यांची फळी नाही.
बीड लोकसभा मतदारसंघ आघाडीत आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिला आहे. यापूर्वी पक्षाने (फूट पडण्याअगोदर) एकवेळा बीड लोकसभा मतदारसंघात विजय मिळविला आहे. 2014 च्या पोटनिवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिला नव्हता. दरम्यान, आता महाविकास आघाडीच्या नव्या समीकरणात राष्ट्रवादीकडेच ही जागा असेल. दरम्यान, डॉ. नरेंद्र काळे यांना उमेदवारी न मिळाल्यास पक्षाशी व नेत्यांशी एकनिष्ठ असलेल्यांना ऐनवेळी डावलले जाते, असा संदेश मतदारांत जाऊ शकतो. उमेदवारी नाही मिळाली तरी ते बंडखोरी करतील, अशी शक्यता नाही.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.