

Beed News : बीडमधील गाजलेल्या ६८ कोटींच्या जमीन मावेजा घोटाळा प्रकरणात तुरुंगवास भोगत असलेल्या बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार यांनी बुधवारी (दि. १४) जामीन मंजूर केला आहे.
यापूर्वीच्या सुनावणीवेळी पाठक याचा जामीन अर्ज मागे घेण्यात आला होता. त्यावेळी याच खंडपीठात जामीन अर्जावर सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली होती, जी मान्य झाली होती. पाठक याच्या बाबतीत पुरवणी दोषारोपपत्र आल्यानंतर त्याचा जामीन अर्ज खंडपीठाने मंजूर केला.
पाठक याच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर खटल्याच्या मुळ दोषारोपपत्रात आणि पुरवणी दोषारोपपत्रात पाठक याच्या विरोधात नोंदविलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने पुरावे आढळून येत नाहीत. गुन्ह्याचा तपास एकतर्फी केला गेला. कोणत्याही साक्षीदाराने पाठक याच्या विरोधात कसलेही आरोप केले नाहीत.
साक्षीदाराने जे आरोप केले ते इतर सहआरोपींच्या बाबतीत आहेत. पाठक याच्यावर कोणीच थेट आरोप केले नाहीत. जी कागदपत्रे आहेत, ती तपास अधिकाऱ्यांकडे आहेत. पाठक याच्या बाबतीत तपास संपला आहे. त्याच्याकडे कुठलीही वसुली (रिकव्हरी) बाकी नाही. जी वसुली झाली त्यातून पाठक याच्याविरुद्ध गुन्हा केल्याचे निष्पन्न होत नाही.
साक्षीदारांची यादी पाहता प्रकरण चालणे व संपणे याला प्रदीर्घ कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्याला तुरुंगात ठेवणे न्यायोचित होणार नाही. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सचिन सलगरे यांनी काम पाहिले. ॲड. देवांग देशमुख, विशाल चव्हाण, प्रसाद राजापूरकर, उबेद हाशमी, मिनल देशमुख, शितल कार्ले, अश्वीन देशमुख आणि क्षितीज पंडित यांनी ॲड. देशमुख यांना सहकार्य केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.