
Kala Kendra : नृत्यकलेच्या नावाखाली अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची बीड पोलिसांनी कला केंद्रातून सुटका केली आहे. मुलीला बनावट कागदपत्रांच्या आधारे बालगृहातून सोडवून कला केंद्रात नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुलीची रवानगी बीड येथील बालगृहात केली आहे. या प्रकारामुळे कला केंद्र पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील 14 वर्षीय मुलगी आईबरोबर राहते. मुलीच्या वडिलांचे 10 वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. आई इतरांच्या घरी घरकाम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. मुलगी पाडेगाव परिसरातील एका प्रशालेत आठवीमध्ये शिकत होती. परंतु, तिला शिक्षणात रस नव्हता. तिला नृत्य शिकायचे होते.
त्यामुळे पाच-सहा मैत्रिणींसह ती एप्रिल 2025 मध्ये गारखेडा परिसरात राहायला आली. काही दिवसांनी पीडितेने आईला फोन करून आपल्याला इव्हेंटचे काम मिळाले आहे. सोबत डान्स पण शिकणार असल्याचे सांगितले. त्यासाठी सर्व मुली बीडला जाणार असल्याचेही म्हणाली. यानंतर काही दिवसांनी तिने एका क्रमांकावरून फोन करत केज येथील लक्ष्मी थिएटर कला केंद्रात असल्याचे आईला सांगितले होते.
12 एप्रिल रोजी तिने फोन करून मैत्रिणीची आजी वारली आहे, अंत्यसंस्कारासाठी शहरात येणार असल्याचे सांगितले. येथे कला केंद्र चालक नेहा बीडकर, तिचा पती आणि मैत्रिणी संभाजीनगरात आल्या. काही वेळ थांबल्या. यावेळी नेहा आपली बॉस असल्याचे तिने सांगितले. मुलगी कशी राहते, हे पाहण्यासाठी आई 14 एप्रिल रोजी केज येथे गेली. तेव्हा तिने मला इथे राहायचे नाही, असे सांगितले.
परंतु मुलीला घरी न्यायचे असेल तर 7 हजार रुपये आणून द्यावे लागतील, अशी मागणी नेहाने केली. त्यामुळे मी पैसे घेऊन येते तोवर तू इथेच राहा, अशी तिची आई म्हणाली. याआधी या ठिकाणी छापा टाकल्यानंतर पोलिसांनी पीडितेची रवानगी बालगृहात केली होती. इथून पुन्हा नेहानेच बनावट कागदपत्रांच्या आधारे सज्ञान असल्याचे दाखवून तिची सुटका केली.
त्यासाठीच आपणच पैसे भरले असून तुझ्या आईकडून हे पैसे घेऊन ये, मग मी तुला सोडते, असे नेहने सांगितले. गुरुवारी (7 ऑगस्ट) मुलीने आईला फोन केला. "तू येऊ नको, मी आता केज इथून हैदराबादला जाणार आहे", असे सांगितले. त्यानंतर घाबरलेल्या आईने संभाजीनगर पोलिसांत धाव घेत मुलीचे अपहरण केल्याची तक्रार दिली. केज पोलिसांकडे गुन्हा वर्ग झाल्यानंतर तिची इथून सुटका करण्यात आली.
त्यानंतर केज पोलिस ठाण्यात गुरुवारी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुधारगृहाच्या अधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या ताब्यात न देता बनावट कागदपत्रांच्या आधारे नेहा बीडकर या महिलेच्या ताब्यात दिले कसे? या प्रक्रियेत सुधारगृहाचे अधिकारी सहभागी होते का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.