
Beed News, 14 Jan : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलं आहे. देशमुख यांची हत्या करणाऱ्या प्रमुख आरोपींपैकी एक आरोपी अद्याप फरार असल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
तर दुसरीकडे विविध शहरात सर्वपक्षीय मोर्चे काढत संतोष देशमुख यांना न्याय देण्याची या मोर्चातून केली जात आहे. तर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणी प्रकरणाचा थेट संबंध असल्यामुळे खंडणीप्रकणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर (Walmik Karad) हत्येचा गुन्हा दाखल करत त्याच्यावर मोक्का लावण्याची मागणी देखील विरोधकांसह देशमुख कुटुंबियांकडून केली जात आहे.
अशातच सोमवारी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. यावेळी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासह बीडचे एसपी यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. देशमुख कुटुंबियांनी तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केल्यामुळे जुनी एसआयटी बरखास्त करत आता नवीन एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
मात्र, नवीन एसआयटीची स्थापना केल्यानंतर लगेचच बीड (Beed) जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची 14 दिवसांची पोलिस कोठडी आज संपत असून त्याला आता केजमधील सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे कराडला बेल मिळणार की त्याची कोठडी वाढवली जाणार याबाबतच्या चर्चा उधाण आलं असताच प्रशासनाने जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ केल्या जाणाऱ्या आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता असल्याने आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 28 जानेवारीपर्यंत जमावबंदी राहणार आहे.
हे आदेश आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. या आदेशामुळे जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना मोर्चे, निदर्शने किंवा आंदोलने करण्यासाठी परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही, याबाबतचे आदेश बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिले आहेत.
दरम्यान, खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे. ते म्हणाले, "खंडणी ते खून प्रकरणात कटकारस्थान करणारे जे आरोपी आहेत त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करून 302 अंतर्गत फाशीची शिक्षा द्यावी."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.