Nanded News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला रामराम करीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर यांनी काँग्रेस सोडली होती. त्यांच्या जवळच्या असलेल्या काही नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली नव्हती. येत्या काळात विधानसभा निवडणुका डोळयांसमोर ठेऊन काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये जातील, असे वाटत असताना नेमके उलटे घडत आहे.
नांदेड भाजपमधील अनेक दिगग्ज नेत्यांनी भाजपला रामराम करीत महाविकास आघाडीत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे हे नेमके उलटे चित्र जाणवत आहे. त्यातच काही काँग्रेसमधील आजी व माजी आमदार त्यांच्यासोबत भाजपमध्ये येतील असे वाटत असताना तसे होताना दिसत नाही. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू असलेले माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच एकीकडे महिनाभरातच नांदेडमधील भाजपचे नेत्या व माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील यांनी भाजपला (Bjp) रामराम करीत आघाडीला जवळ केले आहे.
दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे देखील भाजप सोडणार असल्याची चर्चा जोरात आहे. खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर यांनी नायगावमधून भाजपने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे समजते. त्यातच आता चव्हाण यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक व माजी पालकमंत्री डी. पी. सावंत (D. P. Sawant) यांनी नांदेड उत्तरमधून निवडणूक लढवण्यासंदर्भात काँग्रेस पक्षाकडे अर्ज देखील दाखल केला आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईत गेलेल्या सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन भूमिका त्यांच्या समोर मांडली. त्यानंतर मंगळवारी त्यांनी दिल्लीमध्ये पक्षाचे राज्यप्रभारी रमेश चेन्निथला यांचीही भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे.
माजी आमदार डी. पी. सावंत यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अनेक जणांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे अशोक चव्हाणांना हा मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशानंतर त्यांचे अनेक समर्थक देखील भाजपमध्ये डेरे दाखल झाले होते. डी. पी. सावंत हे गेले एकही दिवसापासून प्रकृती ठिक नसल्याने काही महिने राजकारणापासून अलिप्त राहिले होते.
त्यामुळेच डी. पी. सावंत हे भाजपात जाणार की काँग्रेसमध्ये राहणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले होतं. पण, काही दिवसांपूर्वी त्यांनी स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये कार्यक्रमाचे बॅनर लावले होते. या बॅनरवर केवळ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार अमिता चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांचे फोटो लावले होते. यावेळी त्यांनी मी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सोबत राहणार, अशी भूमिका स्पष्ट केली होती.
सावंत यांनी अचानक घेतला 'यु टर्न'
त्यानंतर बुधवारी सावंत यांनी अचानक यावरून यु टर्न घेतला असून त्यांनी मी काँग्रेससोबत असल्याचे सांगत नांदेड उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा कॉंग्रेस पक्षाकडे व्यक्त केली. याबाबत त्यांनी पक्षाकडे अर्ज देखील दाखल केला आहे. सावंत यांनी अचानक कॉंग्रेसकडून उमेदवारी मागितले आहे. त्यामुळे सावंत यांच्या या भूमिकेमुळे भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.