Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसचे दिवंगत नेते रामकृष्ण बाबा पाटील, कैलास पाटील, शिवसेनेचे दिवंगत आमदार आर.एम.वाणी, राष्ट्रवादी काँग्रसेचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे प्रा. रमेश बोरनारे यांनी वैजापूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. 1985 ते 2019 दरम्यान आठ निवडणुकीत तीन वेळा काँग्रेस, चार वेळा शिवसेना आणि एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघातून विजय मिळवला.
सर्वाधिक चार वेळा शिवसेनेने (Shivsena) येथे विजय मिळवत या मतदारसंघावर पकड मिळवली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या पहिल्या निडणुकीत या मतदासंघावरील आपली पकड कायम ठेवण्यासाठी शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन्ही पक्ष एकमेकांना भिडण्यासाठी सज्ज झाले आहे.
एकनाथ शिंदे यांनी विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांना उमेदवारी दिली आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने भाजपमधून आलेल्या दिनेश परदेशी यांच्या हाती मशाल सोपवली आहे.या दोन तुल्यबळ उमेदवारांमुळे वैजापूरच्या लढतीकडे राज्याचे लक्ष असणार आहे. या दोन बलाढ्य उमेदवारांमध्ये तिसऱ्या एखाद्या उमेदवाराची एन्ट्री होऊ शकते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी 2024 मध्ये विधानसभा लढवून पुन्हा राजकाणात सक्रीय होण्याची तयारी सुरू केली होती. यासाठी शिवसेनेत त्यांनी दीड वर्षापुर्वीच प्रवेश केला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चिकटगांवकर यांना पक्षात आणले होते.
वैजापूरमधील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून ते मतदारसंघात वावरत असताना अचानक मागील महिन्यात भाजपचे स्थानिक नेते दिनशे परदेशी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाती शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला. (Ramesh Bornare) उमेदवारीचा शब्द मिळाल्यानंतर मातोश्रीवर पंधरा दिवसापुर्वी परदेशी शिवसेनेत दाखल झाले.
परदेशी यांच्या अचानक झालेल्या पक्ष प्रवेशाने दीड वर्षापासून मतदारसंघात काम करणाऱ्या भाऊसाहेब पाटील चिकटगावकर याचा पत्ता कट झाला. परदेशी यांनाच उमेदवारी दिली जाणार याचा अंदाज आल्यामुळे परदेशी पक्षात येण्याआधीच चिकटगांवकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केला.
त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पर्याय होता, पण वैजापूरची जागा महाविकास आघाडीत सोडवून घेणे सोपे नव्हते. जागा सुटली तर तुतारी हाती घेऊन लढण्याची तयारी चिकटगांवकर यांनी केली होती. पण त्यांचा हा प्रयत्न फसला आणि उद्धव ठाकरे यांनी इकडे दिनेश परदेशी यांची उमेदवारी जाहीर केली.
एकनाथ शिंदे यांनी विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांना मतदारसंघासाठी भरघोस निधी देत बळ दिले आहे. दिनेश परदेशी हे काँग्रेस, भाजप आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन पक्षात फिरले आहेत.
नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक राहिलेल्या परदेशी यांच्या गाठीशी विधानसभा लढवण्याचा अनुभव देखील आहे. वैजापूर शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात संपर्क असलेले परदेशी याआधी आमदार होण्याची हुकलेली संधी यावेळी साधतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
चिकटगांवकर तात्यांच्या भूमिकेकडे लक्ष..
तर बोरनारे-परदेशी यांचा खेळ मतदारसंघात तिसरा तगडा उमेदवार मैदानात उतरला तर बिघडवू शकतो. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर सध्या शांत आहेत. पण त्यांची ही शांतता वादळापुर्वीची तर नाही ना? ते प्रत्यक्ष मैदानात उतरून दोन्ही शिवसेनेशी दोन हात करतात? की मग पडद्यामागे राहून `करेक्ट कार्यक्रम` करतात? यावर वैजापूरचा आमदार ठरणार आहे. चिकटगांवर यांचे मतदारसंघावर वर्चस्व आहे. याशिवाय दांडगा जनसंपर्क आणि नातीगोती या जोरावर 2014 मध्ये चिकटागावकर यांनी वैजापूरमध्ये बाजी मारली होती.
2019 मध्ये उमेदवारीवरून कौटुंबिक कलह नको, म्हणून चिकटगांवकर यांनी पुतण्यासाठी माघार घेतली. पण त्यात दोघांचेही नुकसान झाले. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर विद्यमान आमदार असून थांबले, तर ज्या पुतण्यासाठी `त्याग` केला तो ही पराभूत झाला. पाच वर्ष भाऊसाहेब पाटील मुख्य प्रवाहातून बाजूला गेले. दरम्यान, मतदारसंघातील त्यांच्या विरोधकांनी उचल खाल्ली.
राष्ट्रवादीत प्रवेश करत त्यांनी चिकटगांवकर यांनाच पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडले. चिकटगावकर राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर नव्या पर्यायाच्या शोधात असताना त्यांनी विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द घेऊन हाती शिवबंधन बांधून घेतले होते. पण या बंधनानेच त्यांचा घात केला. आता चिकटगावर विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात? हे पहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.