

Chhatrapati Sambhaji nagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेसमध्ये झालेल्या खांदेपालटानंतर शहर आणि ग्रामीण भागात पक्षाच्यावतीने विविध आंदोलने हाती घेतली जात आहेत. अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळा समोर आल्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर अक्रम यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देणारे मेसेज फोनवरून दिले जात आहेत. संबंधिताने दोन मोबाईल क्रमांक देत यावर संपर्क साधण्यास सांगितले.
पोलिसांकडे तक्रार केली तर तुमच्यासह कुटुंबाला संपवू अशी धमकी मोबाईलवरील मॅसेजमधून देण्यात आली आहे. या प्रकरणी सय्यद अक्रम यांनी पोलीस उपायुक्त सातव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. आम्ही राहुल गांधी यांचे बब्बर शेर आहोत, अशा धमक्यांना घाबरणार नाही, असे अक्रम यांनी म्हटले आहे. सैयद अक्रम आणि त्यांच्या कुटुंबीयांना अज्ञात व्यक्तीकडून एसएमएसद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त कार्यालयात भेट देऊन तक्रार केली असून, धमकी देणाऱ्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी सय्यद अक्रम यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमकीचे मेसेज येत आहेत. 'आम्ही तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकू. आम्ही तुमचा मोबाईल हॅक केला आहे आणि त्यावरूनच हा मेसज करत आहे. चुकूनही याची माहिती पोलीसांना देऊ नका. जर या संकटातून वाचायचे असेल तर 91933692575 किंवा 916393030474 वर संपर्क करा' असा मेसेज अज्ञातांकडून करण्यात आला आहे.
या धमकीनंतर काँग्रेस पक्षामध्ये खळबळ उडाली असून सय्यद अक्रम यांच्यासह शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त सातव यांची भेट घेऊन तक्रार दिली आहे. धमकी देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. कधी काळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर वर्चस्व राखलेल्या काँग्रेस पक्षाची राजकीय अवस्था गेल्या काही वर्षापासून बिकट झाली आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती अशा सगळ्याच निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपयश आले आहे.
गेल्या कित्येक वर्षात काँग्रेस पक्षाचा आमदार, खासदार या जिल्ह्यातून निवडून गेलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातही या पक्षाचे बोटावर मोजण्या इतके सदस्य दिसतात. दरम्यान, नुकतीच काँग्रेस पक्षाने नव्याने शहर आणि ग्रामीण भागात संघटन बांधणी केली होती. या नव्या रचनेत अॅड. सय्यद अक्रम यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने शेतकरी, महागाई, इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्यावर नुकतेच काँग्रेस पक्षाने शहरातील गुलमंडी भागात निषेध आंदोलन केले होते. पक्षाला अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस शहराध्यक्षांनाच कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी आल्याने पक्षात चिंतेचे वातावरण आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.