

CM in Marathwada visit : दीड महिन्यापासून गायब झालेल्या पावसामुळे मराठवाड्यासह राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषता मराठवाड्यात खरीप हंगाम गेल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी सरकारकडे केली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात दुष्काळी पाहणीचा दौरा केला. लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपलेली पिके पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'या संकटात तुम्ही एकटे नाही सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, दोन दिवसात दुष्काळाचा जीआर काढतो' अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.
पावसाने पाठ फिरवल्याने औसा तालुक्यातील खरीप पिकांची अवस्था अत्यंत गंभीर झाली असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभे पीक हातचे गेले आहे. या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी औसा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना “या संकटात तुम्ही एकटे नाही, सरकार तुमच्या पाठीशी आहे,” असा दिलासा देत, येत्या दोन दिवसांत दुष्काळाचा जीआर काढून सरसकट व तातडीने मदत करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
तालुक्यात यंदा केवळ सुमारे ५० टक्केच पाऊस झाला आहे. नदी-नाले कोरडे पडले असून, जलसाठ्यांची स्थितीही चिंताजनक आहे. ऐन शेंगा भरण्याच्या काळात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनची अवस्था बिकट झाली आहे. अनेक भागांत सोयाबीन करपले असून, शेंगा फोल राहिल्या आहेत; दाणाच भरला नसल्याचे चित्र मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहिले.
१९७२ नंतरचा हा सर्वांत मोठा दुष्काळ आहे, असे सांगत फडणवीस यांनी परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले. रब्बी हंगामासाठी मदत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा आणि अन्नधान्य उपलब्ध करून देण्याबाबत सरकार तातडीने पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जमाफीचे काम सुरू असून, पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीत रोजगाराची समस्या निर्माण होऊ नये यासाठी जलसंधारणासह रोजगाराची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंचनामे करणे हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे. मात्र मदतीत सरकार कुठेही मागे पडणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. खरोसा, किल्लारी आणि पाचखेडी पाणीपुरवठा योजनेचे संपूर्ण बिल सरकार भरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वीजबिलाच्या प्रश्नावरही सरकारने मोठा निर्णय घेतल्याचे सांगत ४८ हजार कोटी रुपयांची वीजबिलाची रक्कम माफ करण्यात आली असून, पुढेही शेतकऱ्यांवर वीजबिलाचा भार पडू देणार नाही, असे फडणवीस म्हणाले. दुष्काळाच्या संकटातून शेतकरी आणि ग्रामीण भागाला बाहेर काढण्यासाठी सरसकट मदत, तातडीचे निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर सरकारचा भर राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.