

Jalna News : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाची चर्चा सध्या जोर धरताना दिसत आहे. नजीकच्या काळात होणाऱ्या मंत्रिमंडळविस्तारात त्यांना पुन्हा स्थान मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. एका बाजूला या चर्चा सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला त्यांच्या नावाला मोठा विरोध होताना दिसत आहे.
धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्यास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर विरोध केला आहे. यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून मुंडेंच्या समर्थनार्थ ओबीसी नेते मैदानात उतरले आहेत. तसेच त्यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून, या विस्तारात धनंजय मुंडेंचे पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, त्यांचे पुनरागमन एवढे सोपे नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
आता पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमनासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मंत्रिपदाला जाहीर विरोध केला आहे. बीडमधील मराठा समाजाला धनंजय मुंडेंकडून मोठा त्रास झाल्याचा आरोप करत, त्यांना मंत्रिपद दिल्यास राज्यातील मराठा समाजाचा रोष राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला सहन करावा लागेल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यातील गुंडांना पाठीशी घालण्यासाठी, त्यांचे गुन्हे दडवण्यासाठी धनंजय मुंडेंना मंत्रिपद हवे आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला. "राष्ट्रवादीला खून करणारा मंत्री हवा असेल, तर राज्यातील मराठा समाज राष्ट्रवादीपासून दूर जाईल. तसेच भाजप आणि राष्ट्रवादीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील," असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे दिले जाते, ते आम्ही पाहतो, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांनाही लक्ष्य केले आहे.
यावरून आता नवा वाद सुरू झाला असून जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर ओबीसी नेतेही मुंडेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी यावरून मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका करत थेट सवाल केला आहे. वाघमारे यांनी, धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्यायचे की नाही, हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आहे. यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका, असे सांगणारे मनोज जरांगे कोण?" असा सवाल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.