

Dharashiv News : धाराशिव जिल्हा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. याठिकाणी एका खासदारासह दोन आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वर्चस्व सिद्ध केले होते. मात्र गेल्या तीन महिन्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा पराभवाचा धक्का बसला आहे. नगरपालीका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मोठा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे ठाकरे सेनेच्या पराभूत उमेदवार व पदाधिकाऱ्यात नाराजीचा सूर पाहवयास मिळत आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूक, वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सेनेला मोठे यश मिळाले होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठे यश मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालीका निवडणुकीत महाविकास आघाडीचा व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकही नगरपालिका जिंकता आलेली नाही. तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ठाकरे यांच्या सेनेला पराभव स्वीकारावा लागला.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 8 जागी विजय मिळवता आला तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय जिल्हयातील एकाही पंचायत समितीवर वर्चस्व प्राप्त करता आलेले नाही. त्यामुळे स्थानिकच्या निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी, वरिष्ठ नेतृत्वाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केला असल्याने पराभवाला सामोरे जावे लागले असल्याचा आरोप करीत पदाधिकारी पक्षांतराच्या तयारीत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
स्थानिकच्या निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दुर्लक्ष केल्यानं पक्षात गटबाजी झाली आणि त्यामुळे आपला पराभव झाला, अशी भावना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे भूम, परांडा आणि वाशी तालुक्यात ठाकरे शिवसेनेला खिंडार पडणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात रंगू लागला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पराभूत झालेल्या उमेदवारांची नुकतीच मंथन बैठक पार पडली. या बैठकीत पक्षांतराचा सूर उमटल्याचे माहिती आहे. तर पक्षांतर्गत गटबाजीमुळेच आमचा पराभव झाला. तसेच जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. पक्षातीलच काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकृत उमेदवारांना पराभूत करण्यासाठी काम केल्यामूळे ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी आहे. त्यामुळे या तीन तालुक्यातील पराभूत उमेदवार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.
या तीन तालुक्यातील नाराज नेत्याच्या भूमिकेमुळे धाराशिव जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या नाराज गटाची पुढील भूमिका काय असणार आणि ते येत्या काळात कोणत्या पक्षात प्रवेश करणार? यावर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अवलंबुन असणार आहेत. त्यामुळे सर्वांचे या घडामोडीकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.