

Indian election expenditure : मागीलवर्षी बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय मिळवत विरोधकांना धूळ चारली. भाजपने ८९ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळविला. त्याखालोखाल संयुक्त जनता दलाला ८४ जागा मिळाल्या. एनडीएने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यासाठी अमाप पैसा खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे.
राजकीय पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे खर्चाची माहिती सादर केली आहे. ही माहिती आता समोर आली असून त्यामध्ये सर्वाधिक खर्चाची उड्डाणे भाजपने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने निवडणुकीत तब्बल १४६.७१ कोटी रुपये खर्च केला आहे. त्यासमोर काँग्रेसने केवळ ३५.०७ कोटीच खर्च केले.
विशेष म्हणजे भाजपचा हा खर्च एकूण संपत्तीच्या केवळ २ टक्के एवढा आहे. त्यामुळे एवढा खर्च करूनही भाजपची तिजोरी भरलेलीच राहिली. दुसरीकडे काँग्रेसने मात्र एकूण संपत्तीच्या तब्बल २८ टक्के एवढा केला. आधीच राजकीय पक्ष म्हणून मिळणार निधी अत्यंत कमी झाल्याने बिहार निवडणुकीत झालेला खर्च काँग्रेससाठी मोठा झटका ठरला आहे. एवढा खर्च करूनही पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही.
भाजपने २०२० च्या निवडणुकीत ५४ कोटी रुपये खर्च केले होते. यावेळी हा आकडा जवळपास अडीच पटींने वाढल्याचे दिसते. पक्षाला त्याचा फायदा झाल्याचे निकालातून दिसते. भाजपच्या एकूण खर्चाच्या तब्बल ११७ कोटी रुपये वातावरण निर्मिती आणि स्टार प्रचारकांवर केला आहे. प्रचार आणि जाहिरातींसाठी ४३.५३ कोटी, स्टार प्रचारकांच्या प्रवासासाठी ३७.३८ कोटी रुपये खर्च केले. तर इतर नेत्यांच्या प्रवासासाठी ४.४४ कोटी रुपये खर्च केले आहेत.
भाजपने निवडणूक प्रचाराच्या जाहिरातींसाठी सर्वाधिक १४.२७ कोटी रुपये खर्च एकट्या गूगलवर केले आहेत. पक्षाने उमेदवारांना पैसे देतानाही हात आखडा घेतला नाही. उमेदवारांसाठी पक्षाने २९.७१ कोटी रुपयांत तजवीज केली. दुसरीकडे काँग्रेसने स्टार प्रचारकांवर १२.८३ कोटी रुपये तर सोशल मीडियवर ११.२४ कोटी रुपये खर्च केले.
इतर राजकीय पक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केवळ २६.७५ लाख रुपये खर्च केले आहेत. बहुजन समाज पक्षाने ९.०१ कोटी रुपये खर्च केले. तरीही पक्षाचा केवळ एकच आमदार निवडून आला आहे. आरजेडी आणि जेडीयूने अद्याप निवडणूक आयोगाला माहिती सादर केलेली नाही. त्यामुळे या पक्षांचे खर्चाचे आकडे समोर आलेले नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.