

Shivsena V/S NCP News : परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील कुरबुरी थांबत नसून किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीमुळे दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Marathwada Political News) विजयादशमीच्या दिवशीच सईद खान आणि बाबाजानी दुर्राणी यांचे समर्थक समोरासमोर आले होते. एकमेकांना दमबाजी करताना ते अंगावरही गेले.
या प्रकरणी सुरुवातीला पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु नंतर पुन्हा दोघांच्या परस्पर तक्रारीवरून विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. राजकीय कोंडी फोडण्यासाठी (NCP) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषद सदस्य (Babajani Durani) बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीही देण्यात आली. मात्र, तरीही शिवसेना शिंदे गटासोबत त्यांचा सूर काही केल्या जुळत नसल्याने किरकोळ कारणावरून कुरबुरीच्या घटना घडत आहेत.
मागील पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ पाथरी शहर व संपूर्ण तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार बाबाजानी दुर्राणी यांची एकहाती सत्ता होती. पाथरी नगर परिषद गेली पंचवीस वर्षे दुर्राणी यांच्या ताब्यात आहे. (Shivsena) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, ग्रामपंचायतीवर दुर्राणी यांच्या समर्थकाची वर्णी लागते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बाबाजानी यांच्या शब्दानुसार मतदान होत असे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारतीय जनता पक्ष, शिवसेना व कॉंग्रेस पक्षाने अनेक वर्षे प्रयत्न करूनही त्यांना दुर्राणी यांच्यासमोर पर्याय उभा करता आला नव्हता. दुर्राणी यांनी विविध पक्षाच्या स्थानिक नेत्यांना राष्ट्र्वादीत सामील केले. त्यामुळेच मध्यंतरी राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, पक्षाने मुंबईत त्यांची समजूत काढली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले पाथरीतील सईद खान यांची शिवसेना शिंदे गटाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आणि पाथरीत नवे नेतृत्व उभे राहिले.
सईद खान यांनी पाथरी शहरातील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला. परभणीच्या पालकमंत्रिपदी तानाजी सावंत यांची निवड झाल्यानंतर सईद खान यांनी परभणीत कार्यकर्ता मेळावा आयोजित करून पक्षनेतृत्वासमोर स्वतःच्या क्षमता सिद्ध केल्या होत्या. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला पाथरी येथून अल्पसंख्याक आघाडीचे हजारो कार्यकर्ते नेल्यामुळे सईद खान यांनी पक्षाचे लक्ष वेधून घेतले.
तब्बल पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ पाथरी शहर व तालुक्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाला सईद खान यांच्या रूपाने आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच दुर्राणी यांचे कट्टर समर्थक असलेले दादासाहेब टेंगसे, चक्रधर उगले, एकनाथ घांडगे, अशोक गिराम, नाना टाकळकर, प्रल्हाद चिंचाणे, सर्जेराव गिराम, असेफ खान, माजी उपाध्यक्ष युसुफोद्दीन अन्सारी, इरफान शेख, साजेद राज यांनी दुर्राणी यांची साथ सोडून सईद खान यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
विशेष म्हणजे मागील दहा वर्षे बाबाजानी दुर्राणी यांचे स्वीय सहायक असलेले मुकुंद विटेकर हेसुद्धा सईद खान यांच्यासोबत गेले आहेत. एकेकाळी दुर्राणी यांच्या विरोधात उघडपणे कोणीही बोलत नसताना सद्यःस्थितीत त्यांना दूरध्वनीद्वारे अर्वाच्य भाषा वापरली जात आहे. त्याचे संभाषण समाजमाध्यमावर व्हायरल केले जात आहे. एकूणच बाबाजानी दुर्राणी यांच्या एकहाती सत्तेला सईद खान यांनी सुरुंग लावला आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.