Maharashtra Assembly Election 2024 : उमरगा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, यात महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते सक्रियपणे काम करत असताना आता भाजपाचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रचारात सहभागी होत आहेत. यामुळे चौगुलेंना विजयाचा चौकार मारण्याची संधी मिळणार, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.
उमरगा विधानसभा निवडणुकीत दहा उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत, दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारात लढत आहे. (Dnyanraj Chougule) मतदारसंघातील उमरगा, लोहारा तालुक्यात कोट्यावधी रुपयांच्या निधीतुन विकास कामे झाल्याचा दावा चौगुले यांच्याकडून केला जातोय. तर भविष्यात यापेक्षा अधिक निधी आणून विकास कामे करणार असल्याची ग्वाही, चौगुले मतदारांना देत आहेत.
माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, जेष्ठ नेते जितेंद्र शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी निवडणूक प्रचारात सक्रिय झाले आहेत. (Shivsena) महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) तालुक्यात वलय आहे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रिय केल्याने,चौगुले यांना बळ मिळाले आहे.
चौगुले यांनी भाजपाचे जेष्ठ नेते, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांची नुकतीच भेट घेतली. मुरुमच्या विठ्ठलसाई साखर कारखान्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, उमरगा जनता बँकेचे अध्यक्ष शरण पाटील व जेष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाली.
बैठकीत अनेक मुद्दावर चर्चा झाली, पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना महायुतीचा धर्म पाळण्यासाची विनंती करत पाठीशी राहण्याचे आवाहन केले. भाजपाचे जेष्ठ नेते डॉ. चंद्रकांत महाजन, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अँड. अभयराजे चालुक्य यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फळी आमदार चौगुलेंच्या प्रचारासाठी गावोगावी फिरत आहे.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी अपक्ष म्हणुन दाखल केलेली उमेदवारी मागे घेतली होती.आता ते चौगुलेंसाठी काम करताहेत. दरम्यान विकास कामांचा मुद्दा आणि भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतेमंडळींची साथ मिळत असल्याने चौगुलेंसाठी ही जमेची बाजू मानली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.