Municipal Corporation News : महायुती सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सडेतोड उत्तर देत असताता. आमचे सरकार हे देणारे आहे, घेणारे नाही. आमची लेना बँक नाही, तर देना बँक आहे, असा टोलाही ते लगावतात. तर आपली देना बँक आहे म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तांनी शहरातील रस्त्यांसाठी 1950 कोटींचा प्रस्ताव दिला.
शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे सांगत शिंदे यांनी निधी देण्याचे आश्वासनही दिले. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शहरातील विकासकामांचा आढावा महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून घेतला. यावेळी नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील रस्त्यांसाठी विशेष निधीची मागणी महापालिकेच्या वतीने करण्यात आली.
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक पुढे वेरूळ, शनिशिंगणापूरसह इतर देवस्थान, पर्यटनस्थळांना भेटी देतील. (Municipal Corporation) या सर्किटमुळे शहरावर देखील ताण पडणार असून, त्यासाठी शहरातील रस्ते मोठे करणे गरजेचे आहे. नुकत्याच पाडापाडी करण्यात आलेल्या आठ रस्त्यांसाठी 1950 कोटी रुपयांची गरज असल्याचे एकनाथ शिंदे यांच्यासमोर सांगण्यात आले. कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून निधी उभा करण्याची सूचना यावेळी शिंदे यांनी केल्याचे समजते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीसाठी शहरात आलेल्या एकनाथ शिंदे यांनी शहरातील विकास कामांचा आढावा घेतला. प्रशासक जी. श्रीकांत यांनी रस्ते, पाणी तर शासनाच्या निधीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांचे सादरीकरण केले. महापालिकेने शहरातील विकास आराखड्यातील रस्ते, सर्व्हिस रोड अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेत आठ रस्त्यांवर सुमारे पाच हजारांपेक्षा अनाधिकृत मालमत्तांची पाडापाडी केली आहे.
रुंद झालेल्या रस्त्यांची कामे करण्यासाठी पेडीको एजन्सीमार्फत प्रस्ताव तयार केला जात आहे. दर्जेदार पद्धतीने आठ मुख्य रस्त्यांची कामे करण्यासाठी 1950 कोटी रुपयांची गरज असल्याचा प्रस्ताव यावेळी सादर करण्यात आला. त्यावर शिंदे यांनी कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून ठाणे, कल्याण भागात रस्त्यांची कामे करण्यात आलेली आहेत. त्याचा अभ्यास करून हे माॅडेल छत्रपती संभाजीनगरात राबविण्यात यावे, अशी सूचना केली.
त्यासोबत महापालिकेचे उत्पन्न वाढले पाहिजे. मालमत्ताकराची वसूली वाढवा, अशा सूचना त्यांनी केल्या. त्यानंतरही निधी लागल्यास तो गॅप शासनातर्फे भरून काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. रस्ता रुंदीकरणात बेघर झालेल्यांना म्हाडा मार्फत घरे देण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी लागणारे शुल्क म्हाडातर्फे माफ केल्यास बेघरांना परवडतील असे घरे मिळतील, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले. त्यावर योग्य तो निर्णय घेऊ, असे शिंदे यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.