Harshvardhan Jadhav : माजी आमदार हर्षवर्धन जाधव सर्वाधिक चर्चेत, पण तितकेच वादग्रस्त!
Chhatrapati Sambhajinagar : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना 2014 मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एका हाॅटेलमध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकावल्या प्रकरणी काल अटक झाली. नागपूर पोलिसांनी अटक केल्यानंतर छातीत दुखू लागल्याने सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोन वेळा आमदार राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी 2019 मध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. 2 लाख 84 हजार एवढी मतं मिळवत त्यांनी सर्वांनाच धक्का दिला होता. त्यांच्यामुळेच शिवसेनेचा पराभव आणि एमआएमचा विजय झाल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो.
तापट स्वभावाचे हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी आपल्या राजकीय आणि खासगी जीवनात अनेक वादाचे प्रसंग ओढावून घेतले आहे. जिल्हा परिषद सदस्य, चार वेळा विधानसभा लढवून दोनदा विजय, लोकसभेच्या निवडणुकीत पावणे तीन लाखांवर मतं घेत हर्षवर्धन यांनी आपले वडील दिवंगत रायभान जाधव यांचा राजकीय वारसा पुढे चालवला. उच्चशिक्षित, मुद्देसूद मांडणी करत विरोधकांची कोंडी करण्यात तरबेज असलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी राज्यात अनेकदा खळबळ उडवून दिल्याची अनेक उदाहरणं आहेत.
जिल्हा परिषद सदस्य असतांना एका अधिकाऱ्याची जीप थेट धरणात ढकलण्याचा प्रकार, पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असतांना खुलताबाद येथे त्यांच्या ताफ्यात गाडी घुसवण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यातून त्यांना झालेली अमानुष मारहाण, पुण्यात भरधाव वेगाने कार चालवून दांम्पत्याला जखमी केल्या प्रकरणी झालेली मारहाण आणि गुन्हा, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्यावरचे गंभीर आरोप अशा एक ना अनेक प्रकरणांमुळे जाधव यांची महाराष्ट्राला ओळख आहे. (Kannad) 2004 मध्ये खऱ्या अर्थाने हर्षवर्ध हे राजकारणात सक्रीय झाले. जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर अपक्ष विधानसभा निवडणूक लढवत त्यांनी नशिब आजमावले पण पहिल्या प्रयत्नात त्यांना यश आले नाही.
पण 2009 मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून कन्नड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. याच दरम्यान, त्यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ताफ्यात गाडी घुसवली म्हणून पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. आमदारकीची टर्म संपत नाही तोच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आरोप करत त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये शिवसेनेकडून दुसऱ्यांदा हर्षवर्धन जाधव विधानसभेवर निवडून गेले. पण पूर्ण पाच वर्ष ते फक्त नावाला शिवसेनेचे आमदार होते, त्यांचा जिल्हा आणि मुंबईतील वरिष्ठ नेत्यांशीही फारसा संपर्क नव्हता. पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला ते कधी हजर राहिले नाही.
त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकी आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत संजना जाधव यांच्या पराभवाचा ठपका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर ठेवत हर्षवर्धन यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. 2019 मध्येच चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवली आणि पावणे तीन लाखांवर मतं घेत खैरे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले. दरम्यानच्या प्रचार सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिकांनी जाधव यांच्या घरावर दगडफेक करत हल्लाही केला होता. जाधव यांच्या उमेदवारीमुळे झालेल्या मत विभाजनाचा फायदा एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना झाला आणि ते लोकसभेवर निवडून गेले.
हर्षवर्धन जाधव यांनी 'शिव स्वराज्य बहुजन पक्ष' स्थापन केला होता. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर 2019 च्या विधानसभेत राज्यभरात आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करण्याची घोषणा जाधव यांनी केली. पण प्रत्यक्षात फक्त त्यांनीच कन्नडमधून विधानसभा लढवली आणि पराभूत झाले. मराठा आरक्षणाच्या लढ्यात सक्रीय सहभाग, आत्महत्या करणाऱ्या मराठा समाजाच्या तरुणांसाठी समुपदेशन आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याने जाधव यांच्या नावाची देशभरात चर्चा झाली होती. मराठा आरक्षणासाठी हर्षवर्धन जाधव यांनी थेट दिल्लीत जाऊनही आंदोलन केले होते.
2011 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ताफ्यात गाडी घुसवण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी जाधव यांना मारहाण केली. तेव्हा आपल्यावर पोलिसांनी हल्ला केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी त्याच्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करत जाधव यांच्यावरच खटला दाखल केला होता. या घटनेनंतर चौकशीत दोषी आढळलेल्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आणि 2017 मध्ये जाधव यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. मार्च 2020 मध्ये, जाधव यांच्याविरुद्ध अनुसूचित जातीतील व्यक्तीवर अत्याचार कायद्यांतर्गत शाब्दिक हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.
डिसेंबर 2020 मध्ये, पुण्यातील औंध येथे झालेल्या रोड रेज घटनेत बोपोडी पोलिस ठाण्याने त्याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा एफआयआर दाखल केला. ज्यामध्ये नंतर त्याला जामीन मिळाला. आता 2014 मध्ये शिवसेनेचे आमदार असतांना नागपूर येथील एका हाॅटेलमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीत जाण्यापासून रोखले म्हणून हर्षवर्धन जाधव यांनी एका पोलिस अधिकाऱ्यांच्या श्रीमुखात भडकावली होती. या प्रकरणात जाधव यांना अटक झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.