
Beed, 02 March : संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करून बीड राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडीत गाठणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरोधात आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी एल्गार पुकारला आहे. मी अन्याय सहन करणारा माणूस नाही. आता कुठं उजडेल तिथे उजडेल. पण, सुरेश धस यांना आता सुटी नाही, असा इशारा माजी आमदार आजबे यांनी दिला आहे.
बीड राष्ट्रवादीला घायाळ करणाऱ्या आमदार धस यांच्याविरोधात माजी आमदार बाळासाहेब आजबे (Balasaheb Ajbe) यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. धस यांच्या विरोधात लढताना पक्ष सोडण्याची तयारीही आजबे यांनी ठेवली आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध धस संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
माजी आमदार आजबे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये असतानाही आष्टी मतदारसंघात भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याकडून आमची कामं अडवली जात आहेत. कार्यकर्त्यांची बिलंही अडवली जात आहेत. महायुतीच्या नेत्यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसेल तर स्वतंत्रपणे निर्णय घेऊ. एकवेळ एमआयएमध्ये जावे लागले तरी चालेल, पण आता सुरेश धस यांच्याविरोधात माघार नाही.
मी अन्याय सहन करणारा माणूस नाही. माझी दखल माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही घेतली नाही. एमआयएममध्ये जायची वेळ आली तरी माझे तयारी आहे. माझ्या कुटुंबाला अटक करण्यासाठी खोटी पत्र दिले आहे. आता कुठे उजडेल तिथं उजडेल. आता मी तुमचं प्रकरण काढतो आणि तुम्ही माझं प्रकरण काढतो. सुरेश धस यांना आता सुटी नाही, असा इशाराही बाळासाहेब आजबे यांनी दिला.
आष्टी मतदारसंघात होत असलेल्या गळचेपीबाबत मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावरही ही गोष्ट घातली आहे. कामं सुरू करण्यासाठी आणि त्याची बिलं काढण्यासाठी आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर निर्णय घेऊ, असेही आजबे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या विरोधात रान उठविणारे सुरेश धस यांना आता त्यांच्या आष्टी मतदारसंघातून माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी चॅलेंज दिले आहे. धस यांच्या विरोधात लढण्यासाठी पक्ष बदलण्याची वेळ आली तरी आमची तयारी आहे, असेही आजबे यांनी म्हटल्यामुळे बीडमध्ये सुरेश धस आणि राष्ट्रवादी संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.