
Chhatrapati Sambhajinagar : टेन्शन घेऊ नका, दडपणाखाली राहू नका, तुमची बदली होणार नाही, असे म्हणत सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालक मंत्री संजय शिरसाट यांनी घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना आश्वस्त केलं आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचेच आमदार प्रदीप जैस्वाल यांनी डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याविरोधात आघाडी उघडलेली आहे. डॉ. सुक्रे यांचा कार्यभार काढून घाटीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मात्र त्याचवेळी पालकमंत्री शिरसाट यांनी डॉ. सुक्रे यांची पाठराखण केल्याने आगामी काळात शिवसेनेत शिरसाट विरुद्ध जैस्वाल असे शीतयुद्ध भडकण्याची चिन्हे आहेत.
घाटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातूनच शिक्षण पूर्ण केलेले आणि त्यानंतर वैद्यकीय अधिक्षक पदापासून थेट अधिष्ठाता झालेले डॉक्टर म्हणून शिवाजी सुक्रे यांची ओळख आहे. वर्षभरापूर्वी मंत्री संजय शिरसाट यांनीच सुक्रे यांना अधिष्ठाता म्हणून आणले. विद्यार्थीदशेपासून घाटीतच वावरलेल्या सुक्रे यांना येथील विद्यार्थी, निवासी डॉक्टर, रुग्ण आणि सगळ्याच विषयांची सखोल माहिती आहे. प्रशासनावर पकड असलेल्या डॉ. सुक्रे यांना जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात 'शिवाजी द बॉस' म्हंटले जाते. पण याच सुक्रे यांच्यामागे आता शुक्लकाष्ठ लागले आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्यचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल घाटीच्या अभ्यागत समितीचे अध्यक्ष आहेत. पण काही दिवसांपासून डॉ. सुक्रे यांच्यावर आमदार जैस्वाल नाराज आहेत. जैस्वाल यांनी सुक्रे यांच्या कारभारावर आक्षेप घेत त्याचे पोस्टमार्टम करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आणि उपमुख्यमंत्र्यांकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. घाटी रुग्णालयाला लागणारी यंत्रसामुग्री व इतर कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुक्रे यांच्यावर करण्यात आला आहे. पण यामागे अभ्यागत समिती सदस्यांना कंत्राट न दिल्याचा राग आणि त्यातून भ्रष्टाचाराचे आरोप केले गेल्याचा दावा घाटी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
असे असतानाच संजय शिरसाट यांनी डॉ. सुक्रे यांना आश्वस्त केलं आहे. टेन्शन घेऊ नका, दडपणाखाली राहू नका, तुमची बदली होणार नाही, असा दिलासा शिरसाट यांनी दिला. एका कार्यक्रमासाठी घाटी रुग्णालयात आले असताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले, की सुक्रे घाटीचे विद्यार्थी असून, येथेच ते अधिष्ठाता आहेत. त्यांच्यामुळे 2 वर्षांत घाटीचा चेहरामोहरा बदलला आहे. वर्षभरापूर्वी माझ्यासमोर अधिष्ठाता पदासाठी डॉ. संजय राठोड आणि डॉ. शिवाजी सुक्रे असे दोन पर्याय होते. त्यात मी सुक्रेंची निवड केली. सध्या पेपरमध्ये मी आणि सुक्रेच चर्चेत असतो. परंतु, टेन्शन नको, तुमची बदली होणार नाही, असे शिरसाट म्हणाले.
शिरसाट यांच्या या दाव्यानंतर शिवसेनेत पुन्हा शिरसाट विरुद्ध जैस्वाल शीतयुद्ध भडकण्याची चिन्हे आहेत. आधीच शहरात शिवसेनेत आमदार प्रदीप जैस्वाल आणि मंत्री संजय शिरसाट यांचे दोन गट आहेत. या दोन्ही नेत्यांचे पटत नसल्याने दोन पक्ष असल्यासारखे वातावरण आहे. या दोन नेत्यांतील रस्सीखेच सातत्याने सुरु असते. शहरातील शिवसेनेवर वर्चस्व ठेवण्यावरून या दोन्ही नेत्यात संघर्ष प्रारंभापासून आहे. मंत्री झाल्यावर संजय शिरसाट यांनी संघटनेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र ज्या मध्य मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे, तो भाग प्रदीप जैस्वाल यांनी बांधून ठेवला असल्याने तिकडे शिरसाट यांना शिरकाव करता आलेला नाही. यावरून वेळोवेळी दोन्ही गटांत धुसफूस होतच असते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.