Shiv Sena News : पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अखेर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना 'जोर का झटका' दिला आहे. चार महिन्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात मनमानी पद्धतीने कारभार करत सर्वाधिक निधी आपल्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघासाठी नेणाऱ्या अब्दुल सत्तार यांना नवे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी हिसका दाखवत आधी मंजूरी दिलेल्या तब्बल 20 कोटींच्या कामावर फुली मारली आहे.
ही सगळी कामे रद्द करून हा निधी इतर विभागांकडे वळवण्यात आला आहे. या पैकी साडेपाच कोटी ही पोलीस विभागाला नवी वाहने घेण्यासाठी देण्यात आला आहे. संदीपान भुमरे हे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर साडेचार महिन्यांसाठी पालकमंत्री झालेल्या (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांनी जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप झाला.
स्वपक्षातील आमदारांपेक्षी विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी आणि त्यांच्या मतदारसंघातील प्रकल्पांना मंजूरी दिल्याची टीका तेव्हा झाली होती. (Shivsena) यापेक्षाही सत्तार यांनी स्वतःच्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात सर्वाधिक निधी पळवला होता. दीडशे कोटींची कामे एकट्या सत्तार यांच्या मतदारसंघात गेल्याने सत्ताधारी आमदारांमध्येच नाराजीचा सूर होता.
राज्यात सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार आल्यानंतर संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री पद मिळाले. सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील जबाबदारी त्यांच्यावर आली. जिल्ह्याच्या राजकारणात शिरसाट विरुद्ध सत्तार असा संघर्ष कायम राहिला आहे. शिरसाट पालकमंत्री झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटणे अपेक्षित होते.
पहिल्या डीपीडीसी बैठकीच्या आधीच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांच्या मतदरासंघातील अनेक मंजूर कामाचे फेर प्रस्ताव पाठवण्याचे सूतोवाच केले होते. त्यानूसार पहिली बैठक वादळी होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. प्रत्यक्षात ही बैठक अगदी शांततेत पार पडली. सत्तार यांनीही बैठकीत अवाक्षर काढले नाही. शिरसाट-सत्तार यांच्यात दिलजमाई झाल्याच्या चर्चा तेव्हा झाल्या होत्या.
परंतु मार्च महिना उजाडण्याआधीच संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांना झटका दिला. सत्तार यांनी मंजूर केलेली पण त्यांचा कार्यारंभ आदेश न निघालेली 20 कोटींची कामे रद्द केली आहेत. याचे फेर प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आले आहेत. तसेच या रद्द झालेल्या कामांचा निधी पोलीस विभागासह जिल्ह्यातील नागरी सुविधांच्या प्रकल्पांकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
साडेपाच कोटी रुपये ही पोलीस आयुक्तालयाला नवी वाहने घेण्यासाठी देणार असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. ही कामे रद्द करताना आपण चुकीचे काही होऊ नये, जनतेसाठीचा निधी त्यांच्याच योजनांवर खर्च व्हावा या हेतूने निर्णय घेतला आहे. कोणाला दणका वगैरे देण्यासाठी किंवा सूड उगवणे हा यामागे हेतू नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले. आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात जिल्ह्यात चुकीचे काम होऊ देणार नाही, असा इशाराही शिरसाट यांनी दिला.
सत्तार यांचे ग्रह फिरले..
विधानसभा निवडणुकीत काठावरचे यश, मतदारसंघातील मंजूर कामांवर फुली, राष्ट्रवादीच्या आमदाराकडून मंत्रीपदाच्या कार्यकाळात असलेल्या ओएसडींकडून त्रास झाल्याचे आरोप, बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र वाटपासाठी राजकीय दबाव आणल्याची विरोधकांची टीका, अशा चोहोबाजूंनी अब्दुल सत्तार संकटात सापडले आहेत. त्यातच पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही सत्तार यांची कोंडी सुरू केल्याने सध्या त्यांचे ग्रह फिरल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.