Aimim News : फोडा आणि राज्य करा, ही इंग्रजांची नितीच सध्या भाजपा देशात वापरत आहे. महाराष्ट्रात त्यांनी शिवसेना पक्ष फोडला. महाराष्ट्रातून भाजपला संपवायचं असेल तर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे, अशी माझी वैयक्तिक इच्छा असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या विषयावर भाष्य केले.
माझा पक्ष वेगळा आहे, आमचे वैचारिक मतभेद असले तरी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असे मला वाटते. त्याचा मोठा परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल, असा विश्वासही इम्तियाज (Imtiaz Jaleel) यांनी व्यक्त केला. देशात आणि राज्यात भाजपचे राजकारण हे मुळ मुद्यांपासून लक्ष वळवण्यासाठीचे राहिल आहे. हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र हा त्यांचा अजेंडा आहे. हिंदी भाषेची सक्ती हा त्याचाच भाग आहे.
अशा मुद्यांना हवा देत भाजप शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा, शिक्षण अशा विषयांना बाजूला सारत नको ते मुद्दे समोर आणत असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. राज्यातील व देशातील विरोधकांना एकत्र येऊ द्यायचे नाही, ही खेळी सातत्याने भाजपकडून केली जाते. महाराष्ट्रात देखील राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
हिंदी भाषेच्या विरोधात दोन्ही ठाकरे भाऊ एकत्र येऊन मोर्चा काढत आहेत. यातून ते दोघे एकत्र येणार असे संकेत मिळत आहे. मात्र त्याआधीच भाजप आणि महायुतीचे राज्यातील सरकार असा काही निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही, ज्यामुळे हा मोर्चा निघणारच नाही, अशी शंकाही इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. विशेषतः मराठी माणूस आजही या दोन नेत्यांच्या पाठीशी भक्कपणे उभा आहे. हे दोन नेते एकत्र आले तर याचा फटका भाजपला बसणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात याचा परिणाम दिसून येईल.
परंतु भाजप आणि त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला हे नको आहे. त्यामुळे हिंदी भाषेच्या विरोधातील मोर्चा निघू नये आणि राज-उद्धव ठाकरे एकत्र येऊ नयेत, यासाठी ते काहीही करायला मागे पुढे पाहणार नाहीत. परंतु ठाकरे बंधूनी पुढे टाकलेले पाऊल आता मागे घेऊ नये, भाजपला संपवायचे असेल तर त्यांनी एकत्र आलंच पाहिजे, अशी माझीही इच्छा असल्याचे इम्तियाज यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.