अनिरुद्ध धर्माधिकारी
Beed News : पूर्वी ब्राह्मण समाजाने कोणताही गुन्हा केला तरी त्याला माफी मिळे. सध्या भाजपकडून असाच नवा मनुवाद जोपासला जात आहे. भाजपचे नेते-कार्यकर्त्यांनी काहीही केले तरी त्याला माफी मिळते. पारधी समाजातील महिलेच्या विटंबना प्रकरणात गुन्हा सिद्ध करण्याऐवजी गुन्हेगाराला कशारीतीने सोडविता येईल, यासाठीच पोलिस यंत्रणेने काम केल्याचा आरोप करत ‘राज्य लोकांसाठी चालवताय की चोरांसाठी,’ असा खडा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. (Is the state run for the people or for the thiefs : Adv Prakash Ambedkar)
आष्टी तालुक्यातील वाळुंज शिवारात शेतजमिनीचा ताबा घेण्यावरून पारधी महिलेची विटंबना केल्याच्या आरोपाखाली भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल आहे. परंतु पोलिस कारवाईस टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत शनिवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. पण, पोलिसांनी तीन दिवसांचा अवधी मागितल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पोलिस भाजप आमदाराच्या कुटुंबाला वाचविण्यासाठी काम करीत आहेत. पोलिस आरोपींचे वकील असल्यासारखे काम करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा घटनेत आधी एफआयआर नोंदवा, महिलेने घेतलेल्या नावांची नोंद करा. मग चौकशी करा, अशी कार्यपद्धत आहे. परंतु येथे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळले गेलेले नाहीत.
भाजपशी संबंधित या कुटुंबाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यपद्धतीही संशयास्पद आहे. अजामीनपात्र कलमे लावण्यात आलेली असताना व हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळूनही या कुटुंबाला अटक झाली नाही, याकडे आंबेडकर यांनी लक्ष वेधले. यातील आरोपी कुटुंब हे भाजपशी संबंधित आहे. जुना मनुवाद या ठिकाणी लागू झाला आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. गरीब मराठ्यांना न्याय मिळावा, ही सत्ताधाऱ्यांची मानसिकता नाही, असा आरोपही त्यांनी केला.
मराठा आरक्षणासाठी अंबाजोगाई तालुक्यातील एकाने पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या केल्याबाबत आंबेडकर म्हणाले, मराठा समाजाच्या तरुण-तरुणींनी आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये. हा प्रश्न सोडविण्याच्या मागे आम्ही आहोत. आर्थिकदृष्ट्या मागासांचे आरक्षण टिकते, परंतु मराठ्यांचे टिकत नाही, हे फार बोलके चित्र आहे. मराठा समाज असो की धनगर, आरक्षणासाठी मुदत मागून सरकार वेळकाढूपणा करीत असल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.