BJP Clash: पालकमंत्री पंकजा मुंडेंनी जिल्हाधिकाऱ्यांची बाजू घेतली, कुचेंनी वाद घालताच बैठक अर्धवट सोडून बीडला रवाना

Jalna DPDC Meeting News: जालना जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतून जिल्ह्यातील अनेक विकासकामे मार्गी लागतील, निधीची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आमदार नारायण कुचे आणि जिल्हाधिकाऱ्यांमधील वादाचा भडका उडाला आणि त्यातून थेट पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावरच आरोप झाले.
Pankaja Munde Narayan Kuche.jpg
Pankaja Munde Narayan Kuche.jpgSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : जालना जिल्हा नियोजन समितीची आज झालेली बैठक वादांमुळे गाजली. भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्यात वाद झाला. यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची बाजू घेतली. यावर कुचे नाराज झाले, पालकमंत्री महोदय, तुम्ही आमची बाजू न घेता कलेक्टरांची बाजू कशी घेता? असा सवाल करताच पंकजा मुंडे संतापल्या. रागाच्या भरात त्यांनी डीपीडीसीची बैठक अर्धवट सोडली आणि गाडीत बसून बीडकडे निघून गेल्या. या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून भाजपामधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला.

जालना जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतून जिल्ह्यातील अनेक विकासकामे मार्गी लागतील, निधीची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आमदार नारायण कुचे आणि जिल्हाधिकाऱ्यांमधील वादाचा भडका उडाला आणि त्यातून थेट पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावरच आरोप झाले.

बैठकीत विविध विकासकामांवरील चर्चा सुरू असतानाच एका मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले. आमदार नारायण कुचे यांनी पालकमंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर दिले. दरम्यान, आमदारांनी पालकमंत्र्यांना टोकले, त्यांना मधात बोलू देऊ नका आणि तुम्ही जशी जिल्हाधिकाऱ्यांची बाजू घेता तशी, आमचीही बाजू घ्या, असे म्हणत कुचे यांनी पालकमंत्र्यांबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. यामुळे संतापलेल्या मुंडे यांनी रागारागत बैठक अर्धवट सोडली आणि त्या निघून गेल्या.

आमदार नारायण कुचे यांच्या बदनापूर, अंबड नगरपरिषदेतील व न्यायालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मुद्दा बैठकीत उपस्थितीत करण्यात आला. या संदर्भातील फायली, प्रस्ताव कुठे आहे, असे म्हणत कुचे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थितीत केले. पालकमंत्र्यांसमोरच कुचे आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये शा‍ब्दिक चकमक झडू लागली. वाद वाढू नये म्हणून पंकजा मुंडे यांनी हस्तक्षेप केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका योग्य असल्याचे सांगत त्यांची बाजू घेतली.

Pankaja Munde Narayan Kuche.jpg
Pune NCP News: राष्ट्रवादीला पुण्यात लवकरच मोठा धक्का बसणार? तडफदार महिला नेत्या लवकरच राजीनामा देणार? पोस्टमधून दिले संकेत

यावरून नारायण कुचे नाराज झाले आणि त्यांनी पालकमंत्र्यांनी आमदारांची बाजू घेणे अपेक्षित आहे, मात्र त्या जिल्हाधिकाऱ्यांची बाजू घेत आहेत, असा आरोप केला. आपल्याच पक्षाच्या आमदाराकडून आरोप झाल्याने पंकजा मुंडे यांचाही पारा चढला. बैठक सुरूच झाली होती, काही वेळातच हा वाद आणि त्यावरून आरोप झाल्याने पंकजा मुंडे बैठक अर्धवट सोडून सभागृहाबाहेर पडल्या. थेट गाडीत बसून त्यांनी बीड गाठले. भाजपामधील या वादामुळे जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चाच होऊ शकली नाही.

बैठक गुंडाळल्यानंतर काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी आमदार नारायण कुचे यांच्यावर टीका केली. स्थानिक आमदारांनी विकासाचे मुद्दे बैठकीत मांडले पाहिजेत, पण तसे होत नाही, असे ते म्हणाले. पालकमंत्री पंकजा मुंडे या सहा महिन्यातून एकदा जालन्यात येतात, असे म्हणत काळे यांनी झालेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.

Pankaja Munde Narayan Kuche.jpg
Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार? शेख कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; कडक कारवाईचे आश्वासन

खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, डॉ. हिकमत उढाण, बबनराव लोणीकर, नारायण कुचे, संतोष दानवे, विक्रम काळे, सुहास शिरसाट, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषद सीईओ डॉ. कृष्णकांत कनवारीया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, पोलिस अधीक्षक तेघबीर सिंह संधु बैठकीला उपस्थित होते.

निधी परत जातो, पाच आमदार, पालकमंत्री काय करतात?

पालकमंत्री पंकजा मुंडे डीपीडीसीसाठी जालन्यात येताच शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांनी त्यांना गराडा घातला. कोणतीच कामे होत नाहीत, असा नाराजीचा सूर काहींनी लावला. डीपीडीसीचा 118 कोटींचा निधी शासनाला परत जात असेल तर पाच आमदार आणि पालकमंत्री काय करतात? असा सवाल काही नागरिकांनी केला. जालना जिल्ह्याला पूर्णवेळ पालकमंत्री द्या, फक्त झेंडा वंदनाला येणारा पालकमंत्री नको, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

कुचे म्हणतात, वाद नाही, पालकमंत्री का गेल्या?

दरम्यान, या वादावर आमदार नारायण कुचे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पालकमंत्री महोदयांशी माझा कुठलाही वाद झाला नाही. जालना शहर व अंबड, बदनापूर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले नाही, हे मी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत होतो.

जिल्ह्यातील इतर न्यायालयांमध्ये सीसीटीव्ही आहे तसे ते अंबड न्यायालयालाही मंजूर करा, अशी माझी मागणी होती. मी पालकमंत्र्यांशी बोलत असताना जिल्हाधिकारी मध्येच बोलत होत्या, तेव्हा मी फक्त त्यांना मी तुमच्याशी नाही, तर पालकमंत्र्यांशी बोलत आहे, असे म्हटलो. पालकमंत्री महोदयांनाही जशी जिल्हाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेता, तशी आमचीही ऐकून घ्या, एवढंच मी म्हणालो. आता विरोधी खासदाराने माध्यमांना काय सांगितले? हे मला माहित नाही. शिवाय पालकमंत्री बैठक अर्धवट सोडून का गेल्या? हे मी सांगू शकत नाही किंवा त्यांना विचारूही शकत नाही. शेवटी त्या माझ्या नेत्या आहेत, असे कुचे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com