Pawar In Google Trends News : सामान्य लोकांच्या गप्पा राजकारणावर बोलल्याशिवाय पूर्ण होतच नाहीत. राजकारणात रस घेण्यात इंटरनेट यूजर्सही मागे नाहीत. वर्षभरात नेटिझन्सना महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील रस्सीखेच जाणून घेण्यात सर्वाधिक रस असल्याचे गुगल ट्रेंड्समधून स्पष्ट दिसते. किंबहुना, या संघर्षामुळेच या वर्षभरात त्यांच्याकडे नेटिझन्सचे लक्ष वेधले गेले. दोन्ही नेत्यांना समसमान प्रमाणात सर्च केल्याचे हा डेटा दर्शवतो. बारामतीच्या नेटकऱ्यांनी कोणालाही झुकते माप न देता दोन्ही नेत्यांविषयीच्या सगळ्या बातम्या सर्च केल्या आहेत. थोडक्यात बारामती ह्या ‘होम ग्राउंड’मधून इंटरनेटवर दोघांचा स्कोर फिफ्टी-फिफ्टी आहे. (fierce match between Sharad Pawar and Ajit Pawar in the search of networkers)
‘न भूतो (न भविष्यती)’ अशा राजकीय घडामोडींनंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थिरस्थावर झाले. विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी धुरा हाती घेतली खरी, पण ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत नाहीत, अशी चर्चा सुरू झाली. इंटरनेटवर या काळात शरद पवार यांच्याविषयी सर्च करण्यात नेटकऱ्यांना अधिक रस होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, अजित पवार भाजपमध्ये जाणार अशा वावड्या उठायला लागल्या. त्यावेळी अजित पवार नेमके काय करणार आणि शरद पवार यांची भूमिका काय राहणार, हे जाणून घेण्यासाठी दोन्ही नेत्यांना समान प्रमाणात सर्च करण्यात आले. ठळकपणे काही घडले नसले तरी काही तरी घडणार, अशी दाट शक्यता असल्यामुळे याकाळात दोन्ही नेत्यांवर नेटकऱ्यांचे लक्ष होते.
वारंवार विचारल्या जाणाऱ्या ‘भाजपमध्ये जाणार का’ या प्रश्नावर अजित पवार काय बोलतात, हे देखील नेटकऱ्यांनी वारंवार पाहिले. अखेर ‘स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का’ म्हटल्याने तो विषय मिटला. पुढे मे महिन्यात ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी अचानक निवृत्तीची घोषणा केली. पुस्तक बाजूला पडले आणि नेटकरी ‘आता कोण कोणाचे सांगाती’, याचा शोध घेऊ लागले.
गुगल ट्रेंड्सनुसार शरद पवारांबाबत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हाच मुद्दा सर्वाधिक सर्च करण्यात आला. राजीनामा मागे घेऊन पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेताच अजित पवार चर्चेत आले. वाढत्या वयामुळे राजीनामा देणे योग्य आहे, अशी भूमिका मांडलेली असल्यामुळे अजित पवार आता काय करणार, याकडे नेटकऱ्यांचे लक्ष लागले. पुन्हा दोन्ही नेत्यांच्या राजकीय हालचाली नेटकऱ्यांनी समसमान प्रमाणात पाहिल्या. फरक इतकाच की बिरगुंडवाडी, सासवड, वाई, मालेगाव या भागांतून अजित पवार यांना अधिक प्रमाणात सर्च केले गेले. तर शरद पवार यांना बारामती खालोखाल वाई आणि सिन्नर येथून अधिक सर्च करण्यात आले.
महाराष्ट्रातील राजकारण निवांत भासत असतानाच दोन जुलैच्या रविवारी महाराष्ट्राचे राजकारण देशभर ट्रेंडिंग राहिले. महाराष्ट्रासह देशभरातल्या नेटकऱ्यांनी अजित पवार यांना सर्च करून माहिती घेतली. महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये अजित पवार यांच्याविषयी जाणून घेण्यात अधिक रस दिसून आला. अजित पवार यांच्यासोबत असणारे आमदार, राष्ट्रवादीचे काय होणार. अजित पवार आणि शरद पवार, अजित पवार यांचा मुलगा कोण, पार्थ पवार यांचे वय, असे प्रश्न गुगलवर सर्वाधिक विचारले गेले.
अजित पवार यांनी टीका करताना वयाचा मुद्दा लावून धरल्याचा परिणाम म्हणून शरद पवार यांच्या संदर्भात राजीनामा, त्याखालोखाल वयाचा प्रश्न सर्वाधिक वेळा विचारला गेला. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार याकाळात त्यांच्या सोबत दिसून आल्या. त्यांचेही वय नेटकऱ्यांनी शोधले. विशेष म्हणजे शरद पवार यांची संपत्ती एकूण किती रुपये आहे, असेही गुगलला विचारले गेले. याशिवाय शरद पवार यांना मुलगा आहे का, असा वेगळाच प्रश्न अनेकांनी विचारल्याचे गुगल ट्रेंड्सने दाखवले आहे.
दोन्ही पवारांच्या तुलनेत सुप्रिया सुळे यांच्याबद्दल मात्र त्यांचे जुने फोटो, पतीचा व्यवसाय, मुलगी कोण, असे प्रश्न नेटकऱ्यांना विचारावेसे वाटले. शरद पवार यांचे तरुण वयातील फोटो, त्यांचा मोबाईल नंबर, राजेंद्र पवार यांच्याशी शरद पवार यांचे नाते काय, शरद पवार विरुद्ध अजित पवार, रोहित पवार आणि शरद पवार यांचे नाते, असे प्रश्न नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विचारले.
ऑनलाईन सर्चविषयी मिळालेली ही माहिती लोकांची दोन्ही पवारांविषयी निव्वळ उत्कंठा दाखवते, असे नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील दोन प्रवाह आणि त्यांचे अनुयायी यांच्यातील चढाओढही यातून दिसते. शरद पवार हे देशाच्या केंद्रीय राजकीय वर्तुळातील महत्त्वाचे नेते आहेत. महाराष्ट्रच नव्हे; तर बाहेरील राज्यांतही त्यांचा लौकिक आहे.
अजित पवार प्रादेशिक नेते आहेत. स्थानिक पातळीवर युवावर्गात त्यांची क्रेझ आहे, पण त्यांची लोकप्रियता दुधारी तलवारीसारखी आहे. त्यांचे एकेक वाक्य सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. हॅशटॅग अन् मीम्सचा पाऊस पडतो. डिजिटल युद्धभूमीवर कमेंट, शेअर, मीम ही शस्त्रे राजकीय नेत्यांसाठी फार प्रभावी आहेत. मात्र, शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हणतात, हेही विसरून चालणार नाही. थोडक्यात, पवार कुटुंबाचा या वर्षभरातील राजकीय प्रवास नेटकऱ्यांसाठी लक्षवेधी ठरला. आता या ऑनलाईन ट्रेंड्सचा परिणाम वास्तवात आगामी लोकसभा निवडणुकीवेळी कशा प्रकारे होतो, हे पाहणे रंजक ठरेल.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.