Basavraj Patil : बसवराज पाटीलसाहेब,आपण भाजपमध्ये जाणार का? एकदा खरं सांगून टाकाच...

Congress Leader Basavraj Patil : माजी राज्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण...
Basavraj Patil Murumkar
Basavraj Patil MurumkarSarkarnama

Basavraj Patil News : बसवराज पाटील साहेब, एकदा आपल्याला खरं सांगावच लागणार आहे आणि ते एकदा सांगून टाकाच. प्रत्येक निवडणुकीत आपल्या भाजप प्रवेशाची चर्चा होते, मात्र त्याबाबत आपण कधीही काहीही बोलला नाहीत. तशी बोलण्याची गरजही नव्हती, कारण आपल्या पक्षनिष्ठेबाबत कुणालाही शंका नाही. आता लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. काँग्रेस अडचणीत आहे आणि पुन्हा आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू करण्यात आल्या आहेत. आपण कोणत्या पक्षात प्रवेश करावा हा अपला अधिकार आहे, लोकशाहीने तो अधिकार सर्वांना दिला आहे. मात्र आपल्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, मतदारांत संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे आता आपल्याला खरं सांगून टाकावंच लागणार आहे.

बसवराज पाटील साहेब, धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे आपण एकमेव मातब्बर नेते आहात. निवडणूक आली की आपल्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होते किंवा विरोधकांकडून तशी चर्चा मुद्दाम सुरू केली जाते. विरोधकांकडून आपल्याबाबत अफवा पसरवल्या जातात. मात्र आतापर्यंत त्याकडे लोक फारसे लक्ष देत नसत, कारण आपल्या काँग्रेस पक्षावरील, काँग्रेसच्या विचारांवरील निष्ठेबाबत केणालाही शंका नाही. यावेळची चर्चा मात्र गांभीर्याने सुरू आहे. एक केंद्रीय मंत्री आपल्यासाठी मध्यस्थी करत आहेत, असंही सांगितलं जात आहे.

Basavraj Patil Murumkar
Ajit Pawar : " आता कितीही किंमत मोजावी लागली तरी..."; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना स्पष्टच सांगितलं

कदाचित या सर्व अफवा असतील. त्यामुळेच तर आपण समोर येऊन बोलण्याची गरज निर्माण झाली आहे. बसवराज पाटील साहेब, आपण काँग्रेसच्या विचारसरणीचे पाइक आहात. देशभरातील राजकीय वर्तुळात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचे मानसपुत्र आहात. चाकूरकर साहेबांनी आयुष्यभर काँग्रेसची विचारसरणी जपली. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, मात्र त्यांनी पक्ष सोडला नाही. पराभव झाल्यानंतरही काँग्रेसने त्यांचा सन्मान केला. त्यांना पुन्हा केंद्रात मंत्रिपद दिले, राज्यपालपद दिले. त्याच चाकूरकर साहेबांचे आपण मानसपुत्र आहात, म्हणून आपल्याला समोर येऊन खरं काय ते सांगून टाकावं लागणार आहे. (Basavraj Patil)

पाटील साहेब, आपली गणती चतुर राजकारण्यांमध्ये होते. एकेकाळी आपण दिग्गज नेते डॉ. पद्मसिंह पाटील साहेब यांच्याशी दोन हात केले होते. त्यासाठी किती जिगर लागते, हे जिल्ह्याला माहीत आहे. राजकारणात चढ-उतार येत असतात. आपले बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. हे पद त्यांना दुसऱ्यांदा मिळाले आहे. आपले पुत्र जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. निवडणूक लढवून ते युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष झाले आहेत. 1999 मध्ये उमरगा मतदारसंघातून आपण पहिल्यांदा विजयी झालात. राज्यात काँग्रसचे सरकार आले. पक्षाने आपल्याला राज्यमंत्री केले. पुढच्या निवडणुकीत आपला पराभव झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2009 मध्ये उमरगा मतदारसंघ आरक्षित झाला. त्यामुळे पक्षाने आपल्याला औसा मतदारसंघातून उमेदवारी दिली. तेथील निष्ठावंतांना डावलून पक्षाने आपल्याला प्राधान्य दिले. आपण त्या संधीचे सोने केलात. काही दिवसांतच औशात जम बसवून आपण विजयश्री खेचून आणलीत. हेच आपले कौशल्य आहे, मात्र त्यावेळी पक्षाने आपला योग्य सन्मान केला नाही, हे मान्य करावे लागेल. इतके कौशल्य दाखवूनही आपल्याला मंत्रिपद मिळाले नाही. त्यानंतरच्या निवडणुकीतही आपण औशातून निवडून आलात. त्यावेळीही पक्षाने आपल्याला मंत्रिपद दिले नाही.

गेल्या निवडणुकीत मात्र आपला पराभव झाला. त्यानंतर आपल्याला पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी संधी मिळाली. त्याचे सोने करण्याची संधी आपल्याकडे चालून आली आहे. धाराशिवचे खासदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीतील शिवसेनेलाच सुटण्याची शक्यता आहे. असेही सांगितले जात आहे की काँग्रेसने ही जागा सोडवून घ्यावी आणि आपल्याला उमेदवारी द्यावी, असा आपला आग्रह आहे. त्यात गैर काहीही नाही. (Congress News)

गेल्या निवडणुकीत मात्र आपला पराभव झाला. त्यानंतर आपल्याला पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी संधी मिळाली. त्याचे सोने करण्याची संधी आपल्याकडे चालून आली आहे. धाराशिवचे खासदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीतील शिवसेनेलाच सुटण्याची शक्यता आहे. असेही सांगितले जात आहे की काँग्रेसने ही जागा सोडवून घ्यावी आणि आपल्याला उमेदवारी द्यावी, असा आपला आग्रह आहे. त्यात गैर काहीही नाही.

Basavraj Patil Murumkar
Drugs Mafia Lalit Patil : ‘ललित पाटीलचे हप्ते मालेगावला पोहोचत होते..!’ संजय राऊत यांचा आरोप..

बसवराज पाटील साहेब, आताची चर्चा गांभीर्याने घेतली जात आहे, त्याला कारणेही तशीच आहेत. काँग्रेसच्या स्थापनेला 28 डिसेंबर रोजी 138 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त दोनच दिवसांपूर्वी धाराशिव येथे काँग्रेसची बैठक झाली. त्या बैठकीला आपण, आपले बंधू किंवा आपले पुत्रही उपस्थित राहिले नाहीत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या तरुण नेत्यांनी एक शिबिर आय़ोजित केले होते. त्या शिबिराला आपण अर्थसाह्य केले, मात्र हजेरी लावली नव्हती. प्रचंड क्षमता, धाडस असतानाही आपण स्वतःला फार मर्यादित करून घेतला आहात.

पत्रकारांनाही आपल्याशी बोलायचे असेल तर आधी आपल्या पीएशी संपर्क साधावा लागतो, अशी चर्चा आहे. बदलत्या काळात आपल्यालाही बदलावे लागणार आहे. अन्यथा आपण कोणत्याही पक्षात राहा, त्याला फारसा अर्थ राहणार नाही. येत्या काही दिवसांत आपल्या कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक आहे म्हणे. त्यात आपण खंर काय ते सांगून टाकाल, अफवा असतील त्याचे खंडन कराल, ही अपेक्षा. पाटील साहेब, खरं काय ते एकदा सांगून टाकाच...!

(Edited By Deepak Kulkarni)

Basavraj Patil Murumkar
CM Shinde On Thackeray: 'अडीच वर्षांपूर्वीची घाण स्वच्छ करतोय'; मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com