Beed Lok Sabha Constituency News : लोकसभा निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यातील प्रमुख भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसेच वंचित बहुजन आघआडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. आता प्रचाराचा जोर आणि ज्वर वाढत आहे. असे असताना जिल्ह्यातील एका गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मतदान करण्याची शपथच घेतली आहे. केज तालुक्यातील कानडीबदन गावच्या ग्रामस्थांनी रविवारी उमेदवार बजरंग सोनवणेंच्या समक्षच ही शपथ घेतली.
भाजपने दोन वेळा खासदार राहीलेल्या प्रीतम मुंडे यांची उमेदवारी टाळत राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मैदानात उतरविले आहे. पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्यासाठी आता भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना या सत्तेतल्या तीनही पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. तसेच पंकजा मुंडेंचेही दौरे सुरु आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाने बजरंग सोनवणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे आणि बजरंग सोनवणेंनीही प्रचाराची जोरदार सुरुवात केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यांच्याकडून पहिल्या व दुसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र आणि गावागावांत जाऊन बैठका घेतल्या जात आहेत. रविवारी बजरंग सोनवणे(Bajrang Sonawane) केज तालुक्यातील कानडीबदन गावात गेल्यानंतर महिलांनी त्यांचे औक्षण केले. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. तसेच, मागील १० वर्षे केंद्रात सत्ता असूनही विद्यमान खासदार संपूर्णत: अपयशी ठरल्याचा आरोप करत या अपयशामुळेच त्यांची उमेदवारी टाळल्याचा दावा बजरंग सोनवणे यांनी केला.
यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 'तुतारी' चिन्हावरच मतदान करण्याची शपथ घेत आपला पाठिंबा उघडपणे व्यक्त केला. गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या आई - वडिलांना साक्ष ठेवून ‘आम्ही इमानदारीने अशी शपथ घेतो की, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे चिन्ह असलेल्या तुतारी या चिन्हा समोरील बटण दाबून इमानदारीने त्यांना मतदान करू आणि विजयी झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांच्या हाताला धरून काम करून घेऊ’, अशी शपथ घेतली.
बीड लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपने सर्वप्रथम पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर करत उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली. पंकजा मुंडे यांचा जिल्ह्यात गाठी - भेटीचे सत्र पूर्ण झाले आहे. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही पंकजा मुंडे यांच्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.