

BJP-Congress Politics : लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध संचालकपदी निवड झालेल्या आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार या नेमक्या कोणत्या पॅनलच्या यावरून सहकार आणि परिवर्तन पॅनलमध्ये दावे-प्रति दावे सुरू झाले आहेत. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून सहकार पॅनलच्या विजयी उमेदवारांच्या पंधरा जणांच्या यादीत शोभा पवार यांचा समावेश करण्यात आला आहे.
सहकार पॅनलच्या या दाव्याने भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांची पडद्यामागील खेळी समोर आली आहे. दुसरीकडे भाजपच्या सहकार पॅनलने शोभा पवार या महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या पहिल्या संचालक असल्याचा दावा करत पाच जागा जिंकल्याचे म्हटले आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत कुठेही अभिमन्यू पवार हे समोर आले नाहीत. ते काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सहकार पॅनलच्या व्यासपीठावर दिसले नाहीत, की भाजपच्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनलच्या.
काँग्रेसच्या अधिकृत पेजवरून शोभा पवार यांचे नाव सहकार पॅनलच्या विजयी उमेदवारात आल्यामुळे अडचण झालेल्या अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी सहकार क्षेत्रात पक्ष नसतो, असे म्हटले आहे. या पोस्टवरून संभ्रम निर्माण होत असला तरी काँग्रेसने आपली दावेदारी भक्कम केली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार यांच्या विजयावरून जिल्ह्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. निवडणुकीत भाजपचे पाच, तर काँग्रेस व मित्रपक्षांच्या सहकार पॅनेलचे १४ उमेदवार विजयी झाले.
मात्र, या निकालानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या (Congress) अधिकृत सोशल मीडिया पेजवर सहकार पॅनेलच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना शोभा पवार यांचाही समावेश करण्यात आला. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या विजयावर केलेल्या दाव्यांना छेद मिळाला आहे. पवार यांच्या पत्नीचा विजय भाजपच्या खात्यात जमा करायचा की सहकार पॅनेलच्या खात्यात? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
निवडणूक प्रचारा दरम्यान, परिवर्तन पॅनलचे नेते आमदार बसवराज पाटील यांनी जाहीर पत्रकार परिषदेत अभिमन्यू पवार हे भाजपचे आमदार आहेत, त्यांच्या पत्नी शोभा पवार या बिनविरोध संचालक झाल्या आहेत. त्यामुळे त्या महायुतीच्या बिनविरोध निवड झालेल्या पहिल्या संचालक असल्याचा दावा केला होता. अभिमन्यू पवार यांनी कुठेही त्या सहकार पॅनलच्या आहेत, अशी भूमिका मांडलेली नाही, असे म्हटले होते. परंतु जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर काँग्रेसने त्या सहकार पॅनलमधूनच निवडून आल्याचा दावा अधिकृतपणे केला आहे.
पवारांची भूमिका सुरुवातीपासूनच 'सस्पेन्स'मध्ये!
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत आमदार अभिमन्यू पवार यांची भूमिका सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय होती. भाजपचे आमदार असूनही पत्नी शोभा पवार यांची बिनविरोध निवड कशी झाली, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. काँग्रेस आणि देशमुख गटाशी पडद्यामागून राजकीय तडजोड करून पत्नीचा मार्ग मोकळा केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या महत्त्वाच्या बैठकांना आमदार पवार उपस्थित नसल्याची टीकाही विरोधकांकडून करण्यात आली होती.
आमदार पवार यांनी या निवडणुकीत आपली भूमिका उघडपणे स्पष्ट केली नसल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत संभ्रम कायम राहिला. एकीकडे भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्या पत्नीचा विजय भाजपच्या यशात मोजला जात होता, तर दुसरीकडे सहकार पॅनेलच्या माध्यमातून त्यांची बिनविरोध निवड झाल्याची चर्चा होती. आता प्रदेश काँग्रेसच्या पोस्टमुळे या चर्चेला अधिक धार आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.