

Latur News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ऐन महापालिका निवडणुकीत लातूरमध्ये ' शहरातून विलासरावांच्या आठवणी शंभर टक्के पुसल्या जातील' असे वादग्रस्त विधान केले. यावरून राज्यभरातून भाजपवर टीकेची झोड उठली. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांना दिलगिरीही व्यक्त करावी लागली. यामुळे भाजप लातूरमध्ये कुठे तरी बॅकफूटवर गेल्याचे चित्र होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमधील सभेत दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करतानाच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची जन्मभूमी नसली तरी कर्मभूमी असलेल्या लातूरमध्ये दिलेल्या योगदानाची आठवणही आवर्जून सांगितली.
देवाभाऊंच्या या भूमिकेनंतर बॅकफुटवर गेलेली भाजप पुन्हा फ्रंटफुटवर आल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. काँग्रेस पक्षासोबत आमची लढाई असली तरी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. ते महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेतृत्व आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या नेत्यांचा मोलाचा वाटा आहे, त्यातील प्रमुख नाव हे विलासराव देशमुख आहे, हे सांगताना मला कुठलाही संकोच नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विलासराव देशमुख यांच्याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी लातूरात बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे अनेक ठिकाणी पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर, फडणवीस हे विलासराव देशमुख यांच्याबाबत काय बोलणार, याकडे लातूरकरांचे लक्ष लागले होते. भाषणाच्या सुरवातीलाच विलासराव देशमुख यांचा फडणवीस यांनी आदरपूर्वक उल्लेख केला. लातूरच्या भूमीने आजवर खूप मोठे नेतृत्व महाराष्ट्राला, देशाला दिले. माजी केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकरकूर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असे नेते या भूमीने दिले.
विलासराव देशमुख यांनी लातूरला वेगळी ओळख दिली. खरंतर हे नाव पक्षाच्या पलिकडे आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी लातूरात गोंधळ झाला. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या विधानामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. राजकीयदृष्ट्या नवीन रेकॉर्ड करायचा आहे, असे त्यांना सांगायचे होते. पण, शब्द चुकीच्या पद्धतीने वापरले गेले. याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. विलासराव देशमुख यांच्याबद्दल आमच्या मनात आदरच आहे. लातूर ही गोपीनाथ मुंडे यांची जन्मभूमी नसली तरी कर्मभूमी आहे. त्यांचेही स्मरणही या निमित्ताने झाले पाहीजे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
विधानसभेची कसर भरून काढू..
भाजपच्या नेत्या डॉ. अर्चना पाटील-चाकूरकर यांनी विधानसभेला चांगली लढत दिली. विजयाच्या जवळ त्या पोहचल्या होत्या, थोडक्याने राहिल्या. ती कसर लातूरकर महापालिका निवडणूकीत भरून काढल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.