

लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे.
माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला.
ठाकरे गटाचे संतोष सोमवंशी आणि त्यांच्या समर्थकांनीही पक्षांतर केल्याने राजकीय समीकरणे बदलली.
Latur Politics News : लातूर जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 2023 मध्ये पक्षात आलेले माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्यासह त्यांचे अनेक समर्थकही पक्षाला जय महाराष्ट्र करून गेले आहेत.
पाटील, सोमवंशी यांनी धनुष्यबाण हाती घेतल्याने अहमदपूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे. विनायक पाटील यांच्या पक्ष प्रवेशाने लातूर जिल्ह्यात शिवसेनेला मोठ्या अपेक्षा आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत विनायक पाटील यांनी पक्षांतराची हॅट्र्रीक केली आहे.
अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून विनायकराव जाधव पाटील हे 1999, 2014 असे दोन वेळा अपक्ष निवडून आले होते. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण त्यांचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या बाबासाहेब पाटील यांनी पराभव केला होता. 2024 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार होते. पुन्हा त्यांचा राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांनी पराभव केला.
अपक्ष, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि आता शिंदेच्या शिवसेनेतून आपली पुढची राजकीय इनिंग खेळू पाहणाऱ्या विनायक पाटील यांची ही आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी असल्याचे बोलले जात आहे. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून विनायकराव पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याचे बोलले जाते. अहमदपूरचे विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासाठी हा प्रवेश डोकेदुखी ठरू शकतो.
विनायकराव पाटील हे पहिल्यांदा 1999 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. त्यानंतर 2014 मध्ये दुसऱ्यांदा ते अपक्ष म्हणून पुन्हा निवडून आले. त्यानंतर भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पक्षाने त्यांना अहमदपूरमधून उमेदवारीही दिली, पण पक्षांतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसला आणि ते पराभूत झाले. भाजपातील दोन बंडखोर उमेदवार निवडणुकीत उतरल्याने विनायक पाटील यांची विजयाची हॅट्रीक हुकली होती.
सगळे हिरो आलेत...
एकनाथ शिंदे यांनी या सगळ्यांचे पक्षात स्वागत करताना लातूरमध्ये शिवसेना झिरो आहे, अशी टीका आपल्यावर केली जाते. परंतु आता लातूर जिल्ह्यातील सगळे हिरो आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे लातूर जिल्हा लवकरच शिवसेनेचा बालेकिल्ला होईल, असा विश्वास मला आहे. लवकरच पंचवीस हजार कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगीतले. यावेळी माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार सुधाकर भालेराव, शंकरअण्णा धोंडगे यांची उपस्थिती होती.
1. लातूरमध्ये कोणत्या नेत्यांनी पक्षांतर केले?
विनायकराव पाटील आणि संतोष सोमवंशी यांनी आपल्या समर्थकांसह पक्षांतर केले.
2. कोणत्या पक्षातून कोणत्या पक्षात प्रवेश झाला?
NCP (शरद पवार गट) आणि ठाकरे गटातून शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश झाला.
3. या पक्षांतराचा राजकारणावर काय परिणाम होईल?
लातूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो.
4. विनायकराव पाटील यांची पार्श्वभूमी काय आहे?
ते माजी राज्यमंत्री असून 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते.
5. पुढील काळात काय घडू शकते?
आणखी नेत्यांचे पक्षांतर होण्याची शक्यता असून राजकीय वातावरण तापू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.