Chhatrapati Sambajinagar : महाराष्ट्रातील एमआयएमचा एकमेव खासदार दुसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी असदुद्दीन ओवेसी पुन्हा दोन दिवसांच्या छत्रपती संभाजीनगगर दौऱ्यावर येत आहेत. दोन आठवड्यापुर्वी तीन दिवस शहरात मुक्काम ठोकून इम्तियाज जलील यांच्यासाठी ओवेसींनी शहर व ग्रामीण भागात सभा घेत पदयात्रा काढल्या होत्या. त्यानंतर आता संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ओवेसी पुन्हा शहरात येत आहेत. (Lok Sabha Election 2024)
येत्या 6 व 7 मे रोजी ओवेसी शहराच्या विविध भागात पदयात्रा काढणार आहेत. सहा मे रोजी शहरातील आमखास मैदानावर ओवेसी यांची जाहीर सभा होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सात तारखेला वाळुंज परिसरात पदयात्रा आणि सभा घेण्याचे नियोजन एमआयएमच्या वतीने करण्यात आले आहे. संभाजीनगर मतदारसंघात महायुतीचे संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
13 मे रोजी या मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मराठवाड्यातील आठ पैकी संभाजीनगर, बीड आणि जालना या तीन मतदारसंघासाठीचा हा शेवटचा टप्पा असणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीने राज्यातील एकमेव खासदार इम्तियाज जलील यांच्या रुपात निवडून आला होता.
यावेळी एमआयएमसोबत वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) नसल्याने इम्तियाज जलील यांचे गणित काहीसे बिघडले आहे. शिवाय अकोल्यात एमआयएमचा पाठिंबा घेऊनही वंचितने संभाजीनगरात मुस्लिम उमेदवार दिला आहे. अफसर खान यांना वंचितने मैदानात उतरवले असून एमआयएमच्या मुस्लिम वोट बॅंकेवर परिणाम करण्याचा हा वंचितचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.
दुसरीकडे ओवेसी आपल्या दोन दिवसांच्या पदयात्रा आणि सभांमधून गेल्या निवडणुकीत मिळालेली दलित मतं आपल्याकडे कशी कायम राहतील, याचे प्रयत्न सुरू आहेत. इम्तियाज जलील यांनी शहरी व ग्रामीण भागात प्रचार करतानाच समाजातील विविध घटकांनाही साद घातली आहे. ओवेसी यांच्या पदयात्रा आणि सभेचा इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांना मतांच्या रुपात किती फायदा होतो, हे लवकरच स्पष्ट होईल. तुर्तास ओवेसी यांनी इम्तियाज यांच्यासाठी आपली संपुर्ण शक्तीपणाला लावल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.