Mahadev Munde Case: परळीत महादेव मुंडे प्रकरणावरुन वाद चिघळला; धनुभाऊ समर्थकांचा राजेभाऊ फड यांना थेट कोर्टात खेचण्याचा इशारा
Beed Politics News : महादेव मुंडे प्रकरणावरून परळीत आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट संघर्ष पेटला आहे. या प्रकरणावरून दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी परळीचे वातावरण तापले आहे. आता हे प्रकरण केवळ तपासापुरते मर्यादित न राहता अस्तित्वाची लढाई बनले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस राजेभाऊ फड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे पडसाद आता उमटू लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या दबावामुळेच आरोपी मोकाट आहेत, मुंडे यांनाही या प्रकरणात आरोपी करा, अशी थेट मागणी फड यांनी केली. 20 मार्चपर्यंत आरोपी गजाआड न झाल्यास परळीत तीव्र जनआंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
राजेभाऊ फड यांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे समर्थकही आक्रमक झाले आहेत. परळी बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडे आणि प्रा.मधुकर आघाव यांनी हे आरोप म्हणजे 'बिनबुडाचे राजकारण' असल्याचे म्हटले आहे.
प्रा.आघाव यांनी फड यांनाच कोंडीत पकडत सवाल केला, ब्रेन मॅपिंग किंवा नार्को टेस्टचे गोपनीय अहवाल राजेभाऊ फड यांच्याकडे कुठून आले. हे अहवाल लीक झाले असतील, तर मग फड हे स्वत:च संशयाच्या भोवऱ्यात आहेत, त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करावे. तसेच, या खोट्या आरोपांमुळे आमदार धनंजय मुंडे यांची बदनामी झाली असून, आता फड यांच्यावर कायदेशीर मार्गाने अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
एक गट रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहे, तर दुसरा गट कायदेशीर कचाट्यात अडकवण्याची तयारी करत आहे. या 'तू तू-मै मैं' मध्ये महादेव मुंडे यांच्या खुनाचा तपास नेमका कोणत्या वळणावर जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 20 मार्चची तारीख आता परळीत नवे वादळ निर्माण करणारी ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

