

MLC Election Results News : विधान परिषदेच्या सतरा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्या दिवसापासून राज्यातील महायुतीचे नेते आम्ही सगळ्या जागा जिंकणार असा दावा करत होते. सतरा पैकी सहा जागा बिनविरोध काढत महायुतीने विजयी घोडदौड सुरू केली होती. उर्वरित अकरा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक झाली, पण ती देखील एकतर्फी. बिनविरोध निवडणुकीने जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवक मतदारांचा अवमान होतो, लोकशाही संपुष्टात येते, असा आरोप करत महाविकास आघाडीने उमेदवार दिले. विजयासाठी आवश्यक संख्याबळ नसताना केलेले हे धाडस आघाडीच्या अंगलट आले.
मराठवाड्यातील चार विधान परिषदेच्या जागांचा विचार केल्यास या सर्व महायुतीने जिंकल्या आहेत. नांदेडमध्ये अमरनाथ राजूकर, परभणी-हिंगोलीत सईद खान, लातूर-धाराशीव-बीडमधून बसवराज पाटील, तर जालना-छत्रपती संभाजीनगरमध्ये सुहास शिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभूत केले. केवळ बिनविरोध होऊ नये या उद्देशानेच आम्ही मैदानात उतरलो होतो, आमच्याकडे संख्याबळ नसताना याची जाहीर कबुली पराभूत उमेदवारांनी दिली होती.
महायुतीकडे उमेदवार निवडून येण्याइतपत संख्याबळ असतानाही नेते गाफील राहीले नाही. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी स्वतः सगळी सुत्रं हाती घेऊन अमर राजूरकर यांच्या विजय प्रत्यक्षात उतरवला. परभणी-हिंगोलीमध्ये शिवसेनेच्या सईद खान यांच्या विरोधातील नाराजीचा फटका महायुतीला काही प्रमाणात बसला. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांनी नगरसेवकांना व्हीप काढल्यानंतरही त्यांचे मतदार फुटल्याचे समोर आले आहे. या पक्षाची बहुतांश मते ही महाविकास आघाडीचे डाॅ. विवेक नावंदर आणि अपक्ष महेश देशमुख यांच्याकडे वळल्याची माहिती आहे.
धाराशीव-बीड-लातूरमध्ये महायुतीने महाविकास आघाडीला चारीमुंड्या चित केले. भाजपाचे बसवराज पाटील हे जवळपास साडेसातशे मते घेऊन विजयी झाले. महाविकास आघाडीच्या सुशील देशमुख यांचा त्यांनी दारूण पराभव केला. इकडे जालना-छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महायुतीच्या सुहास शिरसाट यांनी एकहाती विजय मिळवला. 454 विरुद्ध 134 इतक्या मतांच्या फरकाने त्यांनी महाविकास आघाडीच्या गणेश लोखंडे यांचा पराभव केला. मराठवाड्यात महायुतीकडे पुरेसे संख्याबळ असताना भाजपा, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ही निवडणूक गांभीर्याने लढवली.
तर दुसरीकडे संख्याबळ नसताना केवळ महायुतीचा बिनविरोध विजय होऊ नये, या एकमेव हेतूने मैदानात उतरलेल्या महाविकास आघाडीने विजयासाठी प्रयत्नच केले नाही. एका अर्थाने महाविकास आघाडीने ही निवडणूक महायुतीला बहाल केली होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मराठवाड्यातील चार पैकी तीन जागा भाजापाने तर एक जागा शिंदेंच्या शिवसेनेने जिंकली आहे. नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर पुन्हा भाजपच विधान परिषदेच्या निवडणुकीतही मोठा भाऊ ठरला आहे.