
Dharashiv News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवला असून थेट सरकारविरोधात आरपारची लढाई छेडली आहे. येत्या 29 ऑगस्ट ला जरांगेंनी आरक्षणासाठी राज्यभरातल्या मराठा समाजालासोबत घेत मुंबईत मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. याच आंदोलनासाठी गावागावांमध्ये चावडी बैठका घेत त्यांनी मराठा समाजाची मोट बांधण्यात येत आहे. अशातच आता मराठवाड्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे सर्वेसर्वा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सोमवारी (ता.11) धाराशिव शहरात मराठा समाजाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. याच बैठकीत आतापर्यंत मुंबईच्या आंदोलनासाठी 10 हजार गाड्यांचं बुकिंग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
मुंबईत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीसाठी मुंबईत २९ ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन म्हणजे आरपार आणि अटीतटीची अंतिम लढाई छेडली जाणार आहे. या आंदोलनात राज्यभरातून लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीचा जोर वाढला असून 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर होत असलेल्या आंदोलनाची मराठवाड्यासह राज्यात ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू केली आहे. धाराशिवमध्ये जोरदार तयारी सुरू आहे.
धाराशिव जिल्ह्यात मराठा समाजाकडून मुंबईकडे रवाना होणार्या सर्वच वाहनांवर लावण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा फोटो आणि चलो मुंबई चा नारा असलेले बॅनर आणि पॅम्प्लेट छापले जात आहे. राज्य सरकारला 58 लाख जुन्या नोंदी मिळाल्या आहेत. त्या सर्व नोंदींतून मराठा व कुणबी एकच आहे, हे स्पष्टपणे पुढे आले आहे. हजारो कुणबी बांधवांना कुणबी प्रमाणपत्रेही मिळाली आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली होती.
तसेच मराठा आरक्षणाची लढाई शांततेच्या मार्गानं सुरू राहणार असल्याचंही सांगितलं आहे. सरकारने आपली माणसे पाठवून आंदोलनात भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तरी, आम्ही कोणत्याही परिस्थितीत हिंसक आंदोलन करणार नाही. आमचे आंदोलन शांततेच्या मार्गानेच सुरू राहणार असल्याचं जाहीर केलं होतं.
काही दिवसांपूर्वी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक समाजाला भावनिक साद घातली होती. यावेळी त्यांनी माझं शरीर मला साथ देत नाही. मी कधी जाईल माहित नाही, मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही. मी कधी जाईल माहीत नाही, मी तुमच्यात किती दिवस राहील, माहीत नाही”, असं खळबळ उडवून देणारं विधान केलं होतं. याबाबतचा त्यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
यावेळी जरांगेंनी मला दर 8-15 दिवसांना सलाईन लावली जात आहे. मला खूप वेदना होत आहेत. माझ्या शरीराची नुसती आग होत आहे. माझ्या शरीरातील हाडंही आता दुखायला लागली आहे. उपोषणामुळे माझे शरीर मला आता थोडीही साथ देत नाही. मी फक्त माझ्या माय-बाप समाजाची ताकद वाढावी, मराठ्यांची उंची वाढावी, त्यांची शान वाढवी, त्यांचे शक्ती आणि बळ वाढले पाहिजे, यासाठी धीर धरुन सर्व काही सुरु आहे, असेही मनोज जरांगे हे त्यांच्या व्हिडिओत म्हणाले होते.
आता पुन्हा एकदा मराठा समाजाची ताकद एकवटून आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले आहे. या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजही पुन्हा रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. यामुळे परत एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.