BJP MP Setback : भाजप खासदार अनिल बोंडेंना हायकोर्टाचा दणका; अमरावती बाजार समितीच्या संचालक मंडळ बरखास्तीचा आदेश रद्द!

Anil Bonde Faces HC Setback in Amravati : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला असून समितीच्या संचालक मंडळ बरखास्तीचा आदेश रद्द करण्यात आला आहे.
Amravati Market Committee; BJP MP Anil Bonde
Amravati Market Committee; BJP MP Anil BondeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Amravati News : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमिततेच्या आरोपांवरून संचालक मंडळ बरखास्त करण्याचा जिल्हा उपनिबंधकांचा आदेश न्यायालयाने रद्द केला असून, संचालक मंडळ पुन्हा बहाल करण्यात आले आहे. भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाचा हा निर्णय बोंडे यांच्यासाठी राजकीय धक्का, तर काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांच्या गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीची २०२३ मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व १८ जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमिततेच्या आरोपांवरून १९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा उपनिबंधकांनी संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बाजार समितीवर सहायक उपनिबंधकांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

अनिल बोंडेंच्या पाठपुराव्यानंतर झाली होती कारवाई

शेखर औगड, राहुल तायडे आणि उमेश महिगे यांनी बाजार समितीच्या संचालक मंडळावर आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमिततेचे आरोप करत खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या माध्यमातून चौकशीची मागणी केली होती. बोंडे यांनीही या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे पाठपुरावा केला होता.

Amravati Market Committee; BJP MP Anil Bonde
BJP Setback : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या हर्षवर्धन पाटलांच्या बंधूंवर काँग्रेसने सोपवली महत्त्वाची जबाबदारी; तातडीने दिले नियुक्तीपत्र

त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी लेखापालांची नियुक्ती करून चौकशी केली होती. चौकशी अहवालाच्या आधारे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कारवाईविरोधात बाजार समितीचे सभापती हरीष मोरे आणि अन्य अकरा संचालकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.

न्यायालयाने बरखास्तीचा आदेश ठरवला चुकीचा

न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने कलम ४५ (१) अन्वये करण्यात आलेली तत्कालीन कारवाई चुकीची ठरवत जिल्हा उपनिबंधकांचा बरखास्तीचा आदेश रद्द केला. त्यामुळे सभापती हरीष मोरे यांच्यासह संचालक मंडळाचा बाजार समितीवरील कारभार पुन्हा बहाल झाला आहे. मात्र, त्याचवेळी न्यायालयाने जिल्हा उपनिबंधकांना कलम ४५ (१) अन्वये नव्याने प्रक्रिया सुरू करण्याची मुभाही दिली आहे. त्यामुळे संचालक मंडळाला दिलासा मिळाला असला, तरी नव्याने कारवाईची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता कायम आहे.

Amravati Market Committee; BJP MP Anil Bonde
Anil Bonde Dance Video : दुष्काळाच्या चर्चा, काजू-बदाम वादानंतर अनिल बोंडेंचा DJवर ठेका; VIDEO व्हायरल

'विरोधकांचे खरे चेहरे उघडे पडले'

न्यायालयाच्या निर्णयानंतर बाजार समितीचे सभापती हरीष मोरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. "सत्याचा नेहमीच विजय होतो, हे या प्रकरणाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. लेखापालांच्या अहवालातही भ्रष्टाचार झाला नसल्याचा निर्वाळा आहे. आमच्याविरोधात सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करून संचालक मंडळाला बदनाम करण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. न्यायालयाने न्याय देत विरोधकांचे खरे चेहरे उघडे पाडले आहेत. यापुढेही आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत," अशी प्रतिक्रिया मोरे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.