Chhatrapati Sambhaji Nagar, 28 may : लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महायुतीने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री संदीपान भुमरे यांच्या रुपाने मराठा उमेदवार दिला. स्वतःचा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभेत असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुमरेंना संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी देण्याची जोखीम पत्करली.
गेल्या पंचवीस वर्षांचा जिल्ह्याचा राजकीय इतिहास बघितला तर संभाजीनगरचा (Chhatrapati Sambhaji) खासदार (MP) हा मराठेत्तर राहिलेला आहे. 1998-99 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) रामकृष्ण बाबा पाटील हे विजयी झाले होते. त्यानंतर पंचवीस पैकी वीस वर्ष शिवसेनेचे (Shivsena) चंद्रकांत खैरे, तर 2019 च्या निवडणुकीत एमआयएमचे (MIM) इम्तियाज जलील म्हणजे मुस्लिम समाजाने मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
1980-84 च्या सलीम काझी यांच्यानंतर तब्बल चाळीस वर्षांनंतर हिंदू मतांच्या विभाजनाचा लाभ उठवत इम्तियाज जलील हे खासदार झाले होते. पहिल्या लोकसभा निवडणुकीत 1957-62 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर स्वामी रामानंद तीर्थ निवडून आले होते. त्यानंतर दोन वेळा बी. डी. देशमुख, माणिकराव पालोदकर, बापूसाहेब काळदाते, काँग्रेस (एस) पक्षाकडून साहेबराव पाटील डोणगावकर, रामकृष्ण बाबा पाटील अशा मराठा खासदारांनी जिल्ह्याच्या विकासात योगदान दिले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यानंतर मात्र सातत्याने गैर मराठा उमेदवार या मतदारसंघातून संसदेत निवडून गेला. मोरेश्वर सावे एकदा शिवसेना पुरस्कृत अपक्ष म्हणून मशाल चिन्हावर निवडून आले होते. तेव्हापासून या मतदारसंघात 1999 आणि 2019 च्या रामकृष्ण बाबा पाटील व इम्तियाज जलील यांचा अपवाद सोडला तर शिवसेनेचे मोरेश्वर सावे, प्रदीप जैस्वाल, चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगरमधून निवडून येत संसदेत शिवसेनेची डरकाळी फोडली. मराठा उमेदवार विजयी होत नसल्याची सल या समाजामध्ये कायम होती.
लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात मराठा समाजाने अपक्ष हर्षवर्धन जाधव यांना एकगठ्ठा मतदान केले. पण यातून मराठा खासदार निवडून येण्याऐवजी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आणि एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची लॉटरी लागली. गेल्या वेळी झालेली चूक दुरुस्त करून मराठा खासदार निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून संभाजीनगरची जागा हट्टाने सोडवून घेतली.
पाच टर्म पैठण विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले मंत्रिमंडळातील सहकारी संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली. एवढेच नाही तर त्यांना सर्वप्रकारचे बळही दिले. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची किती साथ भुमरे यांना मिळते, ते विजयी होतात का? यावर गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चा सुरू आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर गद्दारीचा शिक्का बसला. शिवाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सहानुभूती मिळाली याचा मोठा फटका भुमरेंना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संभाजीनगरात भुमरे विरुद्ध खैरे या दोघांमध्येच प्रमुख लढत झाली. या दोघांपैकी एक कोणीतरी निवडून येणार, असा दावा केला जात आहे.
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभा मतदारसंघात कन्नड, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व व औरंगाबाद पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. शिवसेनेला अनुकूल समजला जाणाऱ्या मतदारसंघांपैकी हा एक मतदार संघ आहे. मराठा बहुल असलेला हा मतदार संघ आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या मतदारसंघात स्थानिक रहिवासी म्हणजे मूळचे मतदार कमी असून मायग्रंट वोटर्स म्हणजे बाहेरून येऊन येथे स्थायिक झालेल्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
मात्र बहुतांश मराठी भाषिक मतदार असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य, हे मुस्लिम बहुल असलेले मतदारसंघ आहेत. लोकसभेच्या 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर वेरूळचे शांतिगिरी मठाचे महंत असलेले मौनगिरी महाराजांनी मोठे आव्हान उभे केले होते. मात्र त्यावेळीही मौनगिरी महाराजांना एक लाख 48 हजार मते मिळाली होती.
चंद्रकांत खैरे यांना दोन लाख 55 हजार मते मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार असलेल्या उत्तमसिंह पवार यांना दोन लाख 22 हजार मते मिळाली होती. मौनीगिरी महाराजांना मिळालेली मते ही बहुतांश मराठा समाजातील मतदारांची होती. कारण मराठा समाज हा शांतिगिरी महाराज व वेरूळच्या आश्रमाला मानणारा आहे असे समजले जाते.
लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत दलित व मुस्लिम मतदारांनी एकीची वजन दाखवत एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील यांना विजयी केले. मात्र ते अवघ्या साडेचार हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यावेळी बंडखोरी करून अपक्ष उभे राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी पावणेतीन लाख मते घेतल्यामुळे चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. या मतदारसंघात विजयी होण्यासाठी तगडा मराठा उमेदवार असणे आवश्यक असल्याचे बोलले जात होते.
2016 पूर्वी अशी परिस्थिती नव्हती कारण शिवसेनेचा उमेदवार हा नॉन मराठा असतानाही मराठा उमेदवाराच्या विरुद्ध सातत्याने विजयी झाला. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या उदयानंतर या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झाल्याचे दिसते. त्यामुळे मराठा समाजाचा उमेदवार असेल तर त्याला मोठ्या संख्येने स्वीकारले जाईल, असा काही पक्षांचा दावा होता.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या लक्षणीय आणि निर्णायक आहे. पण हा समाज विखुरलेला आहे. या मतदारसंघात सक्षम आणि सर्वांना परिचित असा मराठा चेहरा दिल्यास ओबीसी जातींपैकी मोठा गट हा भाजपच्या अर्थात युतीच्या बाजूने उभा राहू शकतो, असा निष्कर्ष काढला गेला होता. या पार्श्वभूमीवर महायुतीने मराठा कार्ड टाकल्याचे बोलले जाते. आता हे कार्ड संभाजीनगरात शिंदे सेनेसाठी ट्रम्प कार्ड ठरते का? हे पहावे लागेल.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.