

Beed Crime News : मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्या थांबण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना यासह राज्यात अनेक ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. या घटना काहीशा ताज्या असतानाच आणखी एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे राज्यात अजून किती बळी जाणार, असा प्रश्न आता समजाकडून उपस्थित होऊ लागला आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली या ठिकाणी आरक्षणासाठी एका ४३ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. शुक्रवारी (ता. २७) मध्य रात्री सव्वाबाराच्या सुमारास गावातील पाण्याच्या टाकीवरून उडी मारत त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. शत्रुघ्न अनुरथ काशीद (वय ४३, रा. गिरवली) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला. तिथे काही काळ त्याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनीही शत्रुघ्नची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. आज शनिवारी (ता. २८) उत्तरीय तपासणीनंतर शत्रुघ्नच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ जिल्ह्यात साखळी उपोषणे सुरू आहेत. पाटोदा येथे आंदोलकांनी शासन आपल्या दारी कार्यक्रम बंद पाडला. विविध ठिकाणी कँडल मार्च काढला जात आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. पण मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, आत्महत्या करू नका असे आवाहनही त्यांनी केले आहे. पण दुसरीकडे गेल्या आठ ते दहा दिवसांत मराठा आरणक्षासाठी ८ जणांहून अधिक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. यामुळे राज्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याचबरोबर मराठा समाज अधिकच पेटून उठला आहे. यातूनच काहीजण आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत.
आतापर्यंत झालेल्या आत्महत्या
- छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव - गणेश काकासाहेब कुबेर
-हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील देवजना - लहू ऊर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर
-जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी- शिवाजी किसन माने
-धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील - बळीराम देविदास साबळे
- बीड जिल्ह्यातील ससेवाडी - जगन्नाथ पांडुरंग काळकुटे
-औरंगाबाद जिल्ह्यातील गल्लेबोरगाव- किशोर शिवाजी हार्दे
-धाराशिव जिल्ह्यातील भूम- प्रवीण काकासाहेब घोडके
- नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील भोपाला- ओमकार आनंदराव बावणे
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.