Beed Lok Sabha Election 2024: माझ्या जातीची लेकरं सुधारावीत म्हणून मी जीव पणाला लावला आहे. उपोषणादरम्यान मी दोनदा मरणाच्या दारातून बाहेर आलो आहे. तरीही मी मरणाला भीत नाही. आपली एकजूट आता वाया जाऊन द्यायची नाही. त्यामुळे मी कोणाला मतदान करायचे ते सांगणार नाही, तुम्ही कोणालाही मतदान करा. पण, ज्याला पाडायचं आहे त्याला असं पाडा की पुढच्या पाच पिढ्या ते राजकारणाचा नाद करणार नाहीत, असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील(Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला केलं आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच 48 जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होत आहे आणि प्रत्येकवेळी पंतप्रधानांना आणावं लागतं आहे. इथेच आपला विजय झाला आहे, असं म्हणत मनोज जरांगे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) जिल्हा दौऱ्यावर असताना बीड, धारुर व केज तालुक्यातील कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आडस येथे बोलताना जरांगे-पाटील म्हणाले, नारायण गडावर उपस्थित रहा. आपली जात सुधारत आहे. आठ महिन्यांत बांधावरुन एकही भांडण नाही. बांध टोकरायचे आणि दारुचे व्यसन सोडले की समाज सुधारलाच म्हणून समजा. इतर विषयांसाठी आपण आहोतच असं म्हणत त्यांनी आंदोलनामुळे मराठा समाजातील तरुणांनी दारुचं व्यसन सोडावं असं आवाहन केलं.
मनोज जरांगे यांनी पेंडगाव, आवरगाव, पांगरी, कोळपिंपरी, हसनाबाद, तसेच वाघोली येथील हरीनाम सप्ताहालाही भेटी दिल्या. खोडस, आडस, आसरडोह, अंजनडोह, चोरंबा, चारदरी येथेही त्यांनी भेटी देऊन समाज बांधवांशी संवाद साधला. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आठ जूनला नारायणगडावर होणाऱ्या विशाल सभेला मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनन मनोज जरांगे यांनी केलं.
मराठा आरक्षण (Maratha Reservation) ओबीसीमधूनच घेऊ, मला जेलमध्ये टाकलं तरी मी जेलमध्ये उपोषण करून मराठा आरक्षण घेणारच असा निर्धार त्यांनी यावेळी केला. महिलांनी घरातील कर्त्या पुरुष मंडळींना राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांत जाण्यासाठी रोखावे, मराठ्यांच्या एकीची भीती आहे मतांची नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.