Marathwada Drought : दुष्काळाची भीषणता पाहून केंद्रीय पथकही थबकले; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले!

Central Team Visit : केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या पाहणीच्या माध्यमातून दुष्काळाची तीव्रता आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक संकटाचे वास्तव समोर आले. शेतकऱ्यांनी घाम गाळून उभे केलेले पीक वाचले नाही. या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, हीच त्यांची अपेक्षा आहे.
Marathwada Drought | Crop Damage | Central Team Visit
Marathwada Drought | Crop Damage | Central Team VisitSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Drought News, 09 Oct : मराठवाड्यातील भीषण दुष्काळाची दाहकता केंद्रीय पथकाने आज अनुभवली. राज्यातील महायुती सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. यात मराठवाड्यातील ७६ पैकी ७४ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. अख्खा मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना केंद्रीय पथक आज शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीसाठी धडकले.

दुष्काळाची भीषणता, करपलेली पिके आणि शेतकऱ्यांचे चिंताग्रस्त चेहरे पाहून पथकातील अधिकारीही गहिवरले. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नानेगाव परिसरात पथकाने आज दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी आमदार नारायण कुंचे, राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल उपस्थित होते.

पथकाने शेतकरी अभिजित चव्हाण यांच्या तूर पिकाची पाहणी करून पिकांची सद्यस्थिती आणि नुकसानीची तीव्रता जाणून घेतली. पावसाच्या सुरुवातीच्या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ खंड दिल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले. ‘ग्रीन गोल्ड’ या सोयाबीनच्या वाणाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी बियाणे, मशागत आणि कीटकनाशकांच्या फवारण्यांसाठी मोठा खर्च केला. चार फवारण्या करूनही पीक वाचवता आले नाही. एका एकरासाठी आतापर्यंत सुमारे २२ ते २३ हजार रुपये खर्च झाल्याचे शेतकऱ्यांनी पथकाला सांगितले.

पिकाला चांगल्या शेंगा लागून भरघोस उत्पादन मिळण्याची अपेक्षा होती; मात्र पावसाअभावी पीक वाळले असून, अपेक्षित उत्पादनाच्या तुलनेत अत्यल्प उत्पन्न मिळण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पाहणीदरम्यान काही ठिकाणी पिकांचे जवळपास १०० टक्के नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. शेतीसाठी बँकेकडून घेतलेले कर्ज, खर्चासाठी केलेली धडपड आणि आता डोळ्यांसमोर वाळून गेलेले पीक, या संकटामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

Marathwada Drought | Crop Damage | Central Team Visit
Bypoll Results 2026 : लोकसभा अन् विधानसभेच्या प्रतिष्ठेच्या लढतींमध्ये विरोधकांना जोरदार झटका; भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने

मुलांचे शिक्षण, मुलींचे विवाह आणि कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवायच्या कशा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. काही शेतकऱ्यांनी शेतीत गुंतवणूक करण्यासाठी दागिने बँकेत ठेवून कर्ज घेतल्याची बाबही संवादातून समोर आली. केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या पाहणीच्या माध्यमातून दुष्काळाची तीव्रता आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक संकटाचे वास्तव समोर आले. शेतकऱ्यांनी घाम गाळून उभे केलेले पीक वाचले नाही, तर त्यांच्या कुटुंबाच्या आशा-अपेक्षांनाही मोठा धक्का बसतो. या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, हीच त्यांची अपेक्षा आहे.

Marathwada Drought | Crop Damage | Central Team Visit
Marathwada drought : 35 टक्के पावसाची तूट, पिके संकटात; केंद्रीय पथकासमोर विभागीय आयुक्तांनी मांडले मराठवाड्यातील भीषण दुष्काळाचे वास्तव!

दुष्काळग्रस्तांना वेळेत मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून पाणीपुरवठा, चारा उपलब्धता आणि रोजगार हमीच्या कामांचे नियोजन करण्यात येत आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय पथक ९ व १० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करत आहे. या पाहणीद्वारे पीक नुकसान, पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या तीव्रतेची पडताळणी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com