Nanded Farmer Death Case : शेतकरी मृत्यू प्रकरण : कुबेरफल पतसंस्थेचे उद्घाटन SIT प्रमुखाला भोवलं; थेट उचलंबांगडी, तपासाची सूत्र अर्चना पाटलांकडे

Nanded Farmer Death Case SIT Chief Changed After Manoj Jarange Demands : नांदेडमध्ये फायनान्स कंपनीच्या सक्तीच्या वसुलीमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ऑक्टोबर २०२६ मध्ये उघडकीस आले होते. ज्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती.
Nanded Farmer Death Case
Nanded Farmer Death CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. अवघ्या १० हजार रुपयांच्या कर्जाच्या वसुलीवरून शेतकऱ्याला खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुखाची अखेर बदली करण्यात आली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्याकडून तपासाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून, आता अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील या SIT प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर SIT प्रमुख बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१० हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला डांबून ठेवल्याचा आरोप

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे ४० वर्षीय शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू झाला होता. कर्जाचे हप्ते थकल्यामुळे त्यांना जबरदस्तीने कार्यालयात आणून डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर शिंदे यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले होते. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर अत्याचार करून घातपात केला आणि त्यानंतर गळफास लावल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती.

Nanded Farmer Death Case
Nanded Farmer Death : फायनान्सच्या नावाखाली गुन्हेगारीचा धंदा! वसुलीत राजकीय नेते सहभागी? शेतकऱ्याच्या संशयास्पद मृत्युमळे चर्चेला उधाण

SIT प्रमुखांच्या नियुक्तीवरून वाद

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्याकडे SIT प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान या प्रकरणाचे धागेदोरे कुबेरफल पतसंस्थेपर्यंत पोहोचल्याचे समोर आले. या पतसंस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांना पोलिसांनी अटक केली.

त्याचवेळी कुबेरफल पतसंस्थेच्या उद्घाटन समारंभात रामेश्वर व्यंजने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असल्याचे फोटो समोर आले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तपासाशी संबंधित संस्थेच्या कार्यक्रमात व्यंजने उपस्थित असल्याने त्यांच्या निष्पक्षतेबाबत शंका व्यक्त करण्यात आली. त्यामुळे त्यांना SIT प्रमुखपदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली होती.

जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर निर्णय

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पीडित शेतकरी कुटुंबाची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी SIT प्रमुख रामेश्वर व्यंजने यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आणि त्यांना तपासातून बाजूला करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर रामेश्वर व्यंजने यांच्याकडून SIT प्रमुखपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. आता अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची विशेष तपास पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तपास पथकात कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश करायचा, याचे अधिकारही अर्चना पाटील यांना देण्यात आल्याची माहिती आहे.

Nanded Farmer Death Case
Nanded Farmer Death : 10 हजारांच्या वसुलीसाठी शेतकऱ्याला घरातून उचललं; दोन दिवसांनी फायनान्स ऑफिसमध्ये आढळला मृतदेह, कुटुंबीयांच्या आरोपाने खळबळ

एकीकडे शेतकऱ्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे खासगी फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे आता अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखालील SIT या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने पुढे नेतात या नांदेडसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.