

Nanded Crime News : कायद्याचे रक्षण करण्याची शपथ घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यानेच कायदा तोडल्याची घटना हिंगोलीत समोर आली आहे. येथे पहिली पत्नी जिवंत असतानाच पोलीस कर्मचाऱ्याने दुसरे लग्न थाटले. तर बोहल्यावर चढलेल्या त्या पोलीस कर्मचाऱ्याला रोखण्यासाठी आलेल्या पहिल्या पत्नीलाच लग्नमंडपात अमानुषपणे मारहाण करण्यात आली.
या धक्कादायक आणि संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या अमानुष मारहाणीप्रकरणी हिंगोलीच्या वसमत शहर पोलीस ठाण्यात १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव प्रशांत गजभारे असे आहे.
नांदेड पोलीस दलातील कर्मचारी प्रशांत गजभारे यांचा २०२२ मध्ये शारदा गजभारे यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन वर्षांची मुलगीदेखील आहे. दरम्यान, त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू झाला. फेसबुकवर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे शारदा गजभारे यांच्या पायाखालची जमीन सरकली. हा फोटो पतीच्या दुसऱ्या विवाहासंदर्भातील असल्याचे समोर आले.
यानंतर शारदा गजभारे आपल्या नातेवाईकांसह वसमत शहराजवळील 'कृष्ण मंगल कार्यालयात' पोहोचल्या. येथे त्यांनी नवरदेवाचा पोशाख परिधान केलेल्या आणि डोक्यावर बाशिंग बांधलेल्या प्रशांत गजभारे यांना जाब विचारत होणाऱ्या लग्नावर आक्षेप घेतला. यावेळी लग्नमंडपातच प्रशांत गजभारे यांनी पत्नीवर हल्ला करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तिचा गळा आवळल्याचाही आरोप आहे. या अमानुष मारहाणीत शारदा गजभारे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान, उपस्थित असलेल्या वऱ्हाडी आणि नातेवाईकांपैकी कोणीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, या संपूर्ण घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर या मारहाणीप्रकरणी शारदा गजभारे यांनी हिंगोलीच्या वसमत शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलीस कर्मचारी प्रशांत गजभारे यांच्यासह इतर १२ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.