Crime News : शिवसेनेच्या नगरसेवकानंतर आता भाजपच्या नगरसेवकाची दादागिरी : नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर हात टाकला; धमकी देत बेदम मारहाण

Mahad Chief Officer Assault by BJP Councillor and Party Workers : शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकाकडून रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता अशीच घटना कोकणात घडली आहे.
Crime News; municipal chief officer beaten by BJP Councillor
Crime News; municipal chief officer beaten by BJP Councillorsarkarnama
Published on
Updated on

Raigad Crime News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकाकडून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताच अशीच घटना कोकणात घडली आहे. महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनाच भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तसेच मुख्याधिकारी यांना 'तुला सोडणार नाही' अशी देखील धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर आता सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तर आता काम करावे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या घटनेबाबत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी जाहीर निषेध केला आहे. तर पोलिसांनी तक्रारीवरून भाजप नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. तर विरोधकांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या कथित मारहाणीवरून सरकारला धारेवर धरले. यानंतर पोलिसांनी शिवसेना नगरसेवक म्हात्रे यांना अटक केली आहे.

Crime News; municipal chief officer beaten by BJP Councillor
Crime News : अधिवेशनला गेलेल्या आमदारांच्या घरात चोरी, रोख रक्कम आणि स्वाक्षरीचा धनादेशावर हात साफ; मात्र एका चुकीने चोर फसला

सध्या या प्रकरणावरून राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना आज दुपारी (ता.8) घडली असून मुख्याधिकारी कोळेकर यांना त्यांच्या दालनातच मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे जखमी झाले आहेत. तर त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेमुळे महाड नगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी भीतीच्या छायेखाली असून कर्मचाऱ्यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय सदाशिव कोळेकर हे नगरपालिकेच्या प्रशासकीय भवनातील त्यांच्या दालनात आपले काम करत होते. यावेळी भाजपचे नगरसेवक सुरज बामणे आणि त्यांचे सहकारी दालनात आले. त्यांनी प्रभागातील पाणी प्रश्नाबाबत वाद घातला. या वादामध्ये नगरसेवक सुरज बामणे, राकेश पाटील आणि अन्य एकाने कोळेकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

राकेश पाटील याने मारहाण करण्याबरोबरच शिवीगाळ देखील केली. यावेळी या तिघांनी मारहाण करून तुला सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. यानंतर मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. यावेळी मारहाणीमध्ये कोळेकर जखमी झाल्याने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

Crime News; municipal chief officer beaten by BJP Councillor
Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी PSI ला अटक, पोलीस विभागात एकच खळबळ; अटकेनंतर थेट...

आता या घटनेमुळे सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम कसे करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे . या घटनेबाबत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी याचा जाहीर निषेध केला आहे. दरम्यान महाड शहर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन नगरसेवक सुरज बामणे त्यांचा सहकारी राकेश पाटील आणि अन्य एक अनोळखी व्यक्ती अशा तिघां विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते हे करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com