लक्ष्मीकांत मुळे
नांदेड : आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) नांदेड जिल्ह्यात आपली संघटनात्मक ताकद वाढवण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. त्यानंतर आता महायुतीतील घटक पक्षांनी आपली ताकद वाढवण्यावर जोर दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी नुकतेच (Nanded) नांदेड जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, युवासेनेचे पदाधिकारी जाहीर केले होते. त्यानंतर पक्षात असलेली खदखद अशा पद्धतीने व्यक्त होतांना दिसते आहे. उद्धवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखांसह अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपलाच राष्ट्रवादीने नांदेडमध्ये दणका दिल्याचे दिसून आले आहे. लोहा-कंधारचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी उमेदवारीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा हा निर्णय यशस्वी ठरला आणि चिखलीकर लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेला निवडून आले. विधानसभेला अजित पवारांनी विश्वास दाखवल्याची परतफेड चिखलीकर यांनी आपल्या भाजपमधील शेकडो समर्थकांना राष्ट्रवादीत आणून केल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.
माजी आमदार अविनाश घाटे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख माधव पावडे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत अजितदादांच्या राष्ट्रवादीने नांदेड जिल्ह्यात डबल धमाका केल्याचे बोलले जात आहे. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, नांदेड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अॅड. संदीप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे.
याशिवाय नांदेड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख माधव पावडे, तालुकाप्रमुख गणेश शिंदे, जिल्हा संघटक नेताजीराव भोसले, महानगरप्रमुख पप्पू जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी शिंदे, युवती सेना जिल्हाप्रमुख रोहिणी कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पावडे, युवासेना शहर प्रमुख अभिजीत भालके, ब्रिगेड जिल्हाध्यक्ष योगेश संभाजी शिंदे, दर्यापूरचे सरपंच विलास सूर्यवंशी तसेच भोकरचे दादाराव ढगे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो, पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांच्या भक्कम साथीनं पक्ष अधिक मजबूत होईल आणि जनसेवेत तुमचा सुद्धा मोलाचा सहभाग राहील, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
चिखलीकरांचा वरचष्मा..
व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे चिखलीकर समर्थक म्हणून ओळखले जातात. ते भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार बालाजी पाटील खतगावकर यांचा प्रचार केला होता. मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे काॕग्रेसचे माजी आमदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख माधव पावडे हे देखील कधीकाळी चिखलीकर समर्थक होते. नुकतेच त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
भविष्याचा विचार करत त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर दादाराव ढगे हे भोकर विधानसभा मतदारसंघातील असुन त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. तसेच त्यांची मुलगी दामिनी दादाराव ढगे यांनी उमेदवारी मागितली होती. अविनाश घाटे यांचा काँग्रेस ते भारतीय जनता पक्ष, पुन्हा काँग्रेस-भाजप असा राजकीय प्रवास झाला होता. आता त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.