Latur NEET student suicide : NEET पेपरफुटीने घेतला आणखी एक जीव? लातूरमध्ये विद्यार्थिनीनं जीवन संपवलं, देशभरात संतापाची लाट

NEET-UG 2026 paper leak controversy triggers mental stress among aspirants; Latur student suicide shocks Maharashtra : नीटचा पेपर चांगला गेल्याचा विश्वास असतानाच, पेपरफुटी प्रकरणामुळे परीक्षा रद्द झाली आहे. 21 जूनच्या संभाव्य कठीण परीक्षेच्या चर्चांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Latur NEET student suicide
Latur NEET student suicideSarkarnama
Published on
Updated on

NEET Paper Leak 2026 : देशभरात गाजत असलेल्या NEET-UG पेपरफुटी प्रकरणाचे गंभीर आणि अस्वस्थ करणारे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. परीक्षा रद्द होणे, भवितव्याबाबतची अनिश्चितता आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेची भीती यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लातूरमध्ये NEET ची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, राज्यभरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, NEET पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरलेल्या लातूरमध्येच ही घटना घडल्याने या प्रकरणाची तीव्रता अधिक अधोरेखित झाली आहे.

लातूर (Latur) जिल्ह्यातील गोंदेगाव येथील मैथिली सोनवणे (वय 18) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मृत्यूची नोंद घेत तपास सुरू केला आहे. शनिवारी सकाळी मैथिली शेताकडील घराकडे गेली होती. काही वेळाने ती शेतातील झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. नातेवाईकांनी तिला तत्काळ खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मैथिली सोनवणे ही बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी (Student) होती. बारावीत तिला 51.50 टक्के गुण मिळाले होते. तिची मोठी बहीण इंजिनिअर असून सध्या खासगी कंपनीत कार्यरत आहे. मैथिलीचं स्वप्न डॉक्टर होण्याचं होतं आणि त्यासाठी ती NEET परीक्षेची मनापासून तयारी करत होती. यावर्षी ती लातूरमधील दयानंद कॉलेज येथे NEET परीक्षा देणार होती. तसेच तिने एमएच-सीईटीची परीक्षा पुरणमल लाहोटी कॉलेजमध्ये दिली होती.

Latur NEET student suicide
NEET paper leak issue : ‘अमृतकाल’ नव्हे तर ‘विषकाल’; NEET रद्द होताच राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, मैथिलीने NEET चा पेपर चांगला दिला होता आणि तिला निकालाबाबत आशा होती. मात्र पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली आणि त्यानंतर ती मानसिकदृष्ट्या खचली होती. “माझा अभ्यास चांगला झाला होता… पेपरही चांगला गेला होता… आता पुन्हा काय होणार?” असे ती वारंवार बोलत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

Latur NEET student suicide
NEET exam scam : नीट वादात सदाभाऊ खोतांची मोठी एन्ट्री; राष्ट्रीय परीक्षा संस्था बरखास्तीच्या मागणीने खळबळ

21 जूनच्या परीक्षेची भीती

दरम्यान, आता 21 जून रोजी होणारी NEET परीक्षा अत्यंत कठीण असणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आणि कोचिंग सर्कलमध्ये सुरू आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिक भीती आणि दबाव निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये भवितव्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. “पेपरफुटीचा फटका प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसत आहे,” अशी भावना पालक व्यक्त करत आहेत.

'CBI' अन् 'ED'कडून तपास

देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास सध्या CBI कडून सुरू आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयामुळे ED देखील चौकशीच्या तयारीत असल्याची माहिती आहे. आतापर्यंत CBI ने या प्रकरणात 11 जणांना अटक केली असून, त्यापैकी सात आरोपी महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र नीट पेपरफुटीचं केंद्र

या प्रकरणात लातूरमधील RCC कोचिंग क्लासचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर, नाशिकचा शुभम खैरनार, अहिल्यानगरमधील धनंजय वाघ तसेच पुण्यातील काही प्राध्यापक आणि मुख्याध्यापिकेच्या सहभागाचे धागेदोरे समोर आल्याने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

लातूरपूर्वीच्या घटनांनी चिंता वाढली

लातूरमधील घटनेपूर्वी राजस्थानातील सीकर येथे NEET ची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. कुटुंबीयांच्या मते, परीक्षा रद्द झाल्यानंतर तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता.

यूपी, दिल्ली अन् कर्नाटकमध्ये घटना

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे तिसऱ्यांदा NEET देणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थ्यानेही आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. दिल्लीतील आदर्श नगर परिसरात 20 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, कुटुंबीयांनी परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे ती तणावात असल्याचे सांगितले. कर्नाटकातील कलबुर्गी येथेही अशाच प्रकारची घटना नोंदवण्यात आली आहे.

विद्यार्थी संघटनांचा दावा

सोशल मीडियावर आणि काही विद्यार्थी संघटनांकडून गेल्या 24 तासांत NEET ची तयारी करणाऱ्या आणखी काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र याबाबत अधिकृत सरकारी आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.

“पेपरफुटी थांबवा, विद्यार्थ्यांचे जीव वाचवा”

NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य, मानसिक आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास या तिन्ही गोष्टी धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर “Justice for NEET Students”, “Save Students Future” आणि “Stop Exam Mafia” असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.

देशभरातली विद्यार्थ्यांमध्ये संताप

दरम्यान, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, स्पर्धा परीक्षांमधील वाढता दबाव, अनिश्चितता आणि अफवांचे वातावरण यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण प्रचंड वाढत आहे. अशा परिस्थितीत पालक, शिक्षक आणि प्रशासनाने विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्याची गरज अधिक महत्त्वाची बनली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com