

Shirsat-Jaleel Court Rood Drama: शिवसेनेचे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यातील राजकीय संघर्ष सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वी इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन जाहीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावरून शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.
या प्रकरणात सुनावणी झाली असता इम्तियाज यांनी स्वतः कोर्टात उभे राहून आपली बाजू मांडली. संजय शिरसाट यांच्याविरोधात केलेले सर्व आरोप हे आपण पुराव्यासह केले असल्याचा दावा त्यांनी केला. सहदिवाणी न्यायाधीश एम. एस. ए सय्यद यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला.
इम्तियाज जलील यांनी 24 वर्षे पत्रकारिता आणि दहा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा केल्याचं सांगितलं तर दुसरीकडं पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी वतनाची जमीन लाटण्याचा उद्योग केला, असा आरोप केला. यात त्यांचा मुलगा पत्नी आणि एका विकासकाचा समावेश असल्याचा दावाही त्यांनी केला होता. रेल्वे स्टेशन रस्त्यावरील विट्स हॉटेल मुलाच्या नावावर खरेदी केल्याचे सर्व कागदोपत्री पुरावे माझ्याकडे आहेत. याबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल, विभागीय आयुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं आपण तक्रारी दिल्या. मात्र, या तक्रारींची दखल न घेतल्यानं पत्रकार परिषदेद्वारे जनतेसमोर हे सर्व मांडावं लागल्याचं जलील यांनी न्यायालयात सांगितलं.
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी संबंधित वतनाच्या पाच हजार चौरस फुटावरील भूखंडावर 105 कोटींचा प्रकल्प उभारला जाणार असून त्यातून केवळ 93 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे, ही सरकारी जागा असल्यानं याची लाचलुतपत प्रतिबंधक विभागाकडंही तक्रार करण्यात आली आहे, असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं.
तसंच शिरसाट यांची बाजू मांडणारे अँड. राजेश काळे हे पूर्वी माझे वकील आणि कायदेशीर सल्लागार होते. शिरसाट यांच्या पत्नीचे ते भाऊ असून बहिणीच्या पतीवर आरोप होताच त्यांनी मला एक मेसेज पाठवून माझे वकीलपत्र मागे घेतलं, अशा प्रकारे अचानक वकीलपत्र सोडून माझ्याच विरोधात ते कसे उभे राहू शकतात? नैतिकतेच्या आधारावर ते माझ्या विरोधात हे प्रकरण चालवू शकत नाहीत, असंही इम्तियाज जलील यांनी बाजू मांडताना म्हटलं.
यावर स्पष्टीकरण देताना अॅड. राजेश काळे यांनी न्यायालयाची रीतसर परवानगी घेऊनच आपण इम्तियाज यांचे वकीलपत्र मागे घेतलं होतं. त्यासाठीचं शुल्क सुद्धा मी त्यांना परत केलं आहे. माझ्या नैतिकतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार या न्यायालयाला नसून तो विषय बार कौन्सिलचा आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. संजय शिरसाट हे माझ्या बहिणीचे पती आहेत याची कबुलीही काळे यांनी दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 17 ऑगस्ट रोजी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.