

परभणी महापालिकेतील गटनेतेपदावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत.
प्रचारसभेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांना कडक इशारा दिला.
पक्षात राहून पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Parbhani : परभणी महापालिकेतील गटनेते पदावरून भाजपमध्ये असलेली अंतर्गत धुसफूस सुरूच असताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी झरी येथील आपल्या प्रचारसभेतून पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना चांगलाच दम भरला आहे. निवडणुकीत पक्षात राहूनच पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
पक्षाशी बेईमानी म्हणजे आईशी बेईमानी असल्याचं सांगत अशा लोकांना निवडणुकीनंतर घरी पाठणार आहे. माझे राष्ट्रीय अध्यक्षांशी बोलणं झालं आहे. कोणी दमदाटी करत असेल तर माझा फोन चोवीस तास सुरू आहे, कधीही संपर्क करा, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या व इतर अशा जिल्ह्यातील 124 योजनाच्या विकासाची चारचाकी गाडी शंभरच्या वेगाने धावली पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, परभणी महापालिकेतील गटनेते पदाच्या निवडीवरून नाराज गटाच्या नगरसेवकांनी आज चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. आपले दबावतंत्र कामी येणार असे वाटत असताना बावनकुळे यांनी मात्र या नगरसेवकांची चांगलीच कानउघडणी केल्याचे दिसून आले.
भाजपमध्ये शिस्त, आदेश आणि संघटनात्मक ताकद याबाबत नेहमीच मोठमोठे दावे केले जातात. मात्र परभणी महापालिकेतील गटनेतेपदाच्या निवडीने हे दावे कितपत खरे आहेत, याची चाचणी नुकतीच झाली आणि निकाल थेट झरी गावात लागला.
भाजपच्या महापालिकेतील गटनेतेपदी तिरूमल्ला मोकिंद खिल्लारे यांची निवड झाली. स्थानिक पातळीवरच नव्हे तर पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडूनही त्यांच्या नावाला अधिकृत मंजूरी मिळाली. म्हणजे दिल्ली नाही, मुंबई नाही थेट आदेश तयार, पण तरीही पक्षातील सात नगरसेवकांनी या निर्णयाविरोधात नाकं मुरडल्याने भाजपमधील एकसंघता पुन्हा चर्चेचा विषय ठरली. आपला विरोध मान्य होईल या अपेक्षेने या सात नगरसेवकांनी रविवारी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची झरी येथे सरपंच दिलीपराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
आम्ही आमचे म्हणणे मांडायला आलो आहोत, असा त्यांचा हेतू असावा. पण प्रत्यक्षात भेटीचा शेवट कानउघडणीच्या धड्यात झाला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्री बावनकुळे यांनी पक्षाने ठरवलेल्या व्यक्तीला विरोध करणे म्हणजे शिस्तभंग असल्याचे स्पष्ट शब्दांत सुनावल्याचे समजते. पक्ष मोठा की व्यक्तिगत नाराजी? हा सवाल उपस्थित करत त्यांनी नगरसेवकांना तंबी दिल्यानंतर, अवघ्या काही वेळातच विरोधाची धार बोथट झाली. ज्यांचा आवाज कालपर्यंत बुलंद होता, तो आज संघटनात्मक शिस्तीच्या नावाखाली आपोआप शांत झाला.
1. बावनकुळे यांनी कोणाला इशारा दिला आहे?
भाजपमध्ये राहून पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्या नेत्यांना.
2. हा इशारा कुठे देण्यात आला?
झरी येथे आयोजित प्रचारसभेत.
3. परभणी भाजपमध्ये वाद कशावरून सुरू आहे?
महापालिकेतील गटनेते पदावरून अंतर्गत धुसफूस सुरू आहे.
4. पक्षाकडून कोणती कारवाई होऊ शकते?
शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षातून निलंबन होऊ शकते.
5. या विधानाचा निवडणुकीवर काय परिणाम होईल?
भाजपमध्ये शिस्त कडक होण्याची आणि बंडखोरीवर आळा बसण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.