

Phulambri Shivsena News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेसच्या महाविकास आघाडीला फुलंब्री नगरपंचायतीची सत्ता मिळाली. भाजपच्या सुहास शिरसाट यांचा पराभव करत राजेंद्र ठोंबरे यांनी आमदार अनुराधा चव्हाण यांना धक्का देत नगराध्यक्षपद पटकावले होते.
आता तेच पक्षाच्या ७ आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाच अशा सर्व १२ नगरसेवकांना घेऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मुंबईत उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी हा मोठा धक्का असणार आहे. जिल्ह्यातील सत्ता असलेली एकमेव नगरपालिका आता ठाकरे यांच्या हातातून जाणार आहे.
सहा महिन्यांपूर्वीच राजेंद्र ठोंबरे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, तेव्हा ठोंबरे यांनी याला दुजोरा दिला नव्हता. आता मात्र त्यांच्यासह सात नगरसेवकांसह सत्ताधारी सगळ्या नगरसेवकांचा शिवसेनेतील प्रवेश निश्चित झाला आहे. विरोधी पक्षाची सत्ता असल्यामुळे अपेक्षित विकासकामे करता येत नाहीत, निधी मिळत नाही.
मतदारांनी मोठ्या अपेक्षेने आपल्याला निवडून दिले आहे. निधीअभावी त्यांची कामे होणार नसतील, तर त्या सत्तेचा काय उपयोग? फुलंब्री शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण सत्ताधारी शिवसेना पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी केला आहे.
फुलंब्री नगरपंचायतीच्या राजकारणात मंगळवारी मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे हे सात नगरसेवकांसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे, नगरपंचायतीच्या सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चार असे एकूण १२ नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा निर्णय दोन महिन्यांपूर्वीच घेतल्याचे बोलले जाते.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या दोन बैठका झाल्या होत्या. शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणि विविध विकासकामांबाबत ठोंबरे यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्यांना शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. दरम्यान, स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे प्रवेश लांबणीवर पडला होता. मात्र, आता अडथळे दूर झाल्याचे सांगण्यात येत असून, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सत्ताधारी गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे ठोंबरे समर्थकांचे म्हणणे आहे.
फुलंब्री नगर परिषदेत भाजपच्या सत्तेला सुरुंग लावत महाविकास आघाडीने चमत्कार घडवला होता. डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजेंद्र ठोंबरे यांनी भाजपच्या सुहास शिरसाठ यांचा १७९७ मतांनी पराभव करत धक्का दिला होता. भाजपच्या ताब्यात असलेली ही नगरपालिका महाविकास आघाडीने हिसकावून घेतली होती. एकूण १७ नगरसेवकांपैकी महाविकास आघाडीला सर्वाधिक १२ जागा मिळाल्या आहेत. तर, भाजपला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले होते. ठोंबरे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर नगरपालिकेतील सत्ता समीकरणे बदलणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.