
Parli News : माजी केंद्रीय मंत्री आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं भाजपाच्या महाराष्ट्रातील वाटचालीतलं योगदान खूप मोठं राहिलं आहे. पण त्यांच्या अपघाती निधनानंतर मुंडे दुसरी लेक प्रीतम मुंडे याही राजकारणात आल्या. पंकजा मुंडे या आत्तापर्यंत विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदार तर प्रीतम मुंडे (Pritam Munde) या बीडच्या दोन टर्म खासदार राहिल्या आहेत. आता मुंडेंची तिसरी लेकही राजकारणात उतरली आहे. पण आजही प्रीतम मुंडेंची राजकीय एन्ट्री पंकजा अन् यशश्री या दोन बहिणींपेक्षा खडतर अन् तितकीच हळवी ठरली होती.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या यशश्री मुंडे यांनी राजकारणात पाऊल टाकलं आहे. त्यांनी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. पुढील महिन्यात 10 ऑगस्टला बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीसाठी यशश्री मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण या निमित्तानं पुन्हा एकदा प्रीतम मुंडे यांची 2014 च्या राजकीय एन्ट्रीची आठवणी ताज्या झाल्या आहेत.
प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून दोन टर्म खासदार राहिल्या आहेत. 2014 मध्ये मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या 9 दिवसांत गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर बीड लोकसभा जागेवर पोटनिवडणूक झाली. या लढतीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली होती.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीडच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत 2014 मध्ये प्रीतम मुंडे यांनी जवळपास 6 लाखांच्या विक्रमी मताधिक्क्यानं विजयी झाल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार बजरंग सोनावणे यांचा पराभव केला होता.
तिसऱ्या टर्मवेळी प्रीतम यांनी पंकजा यांच्यासाठी उमेदवारीचा त्याग केला. पण पंकजा यांचा बीड मतदारसंघातील या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनावणे यांनी धक्कादायकरित्या पराभव केला. हा पराभव पंकजा यांच्याइतकाच धनंजय मुंडे यांच्याही तितकाच जिव्हारी लागला होता.
पण पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांंच्या राजकीय एन्ट्रीवेळी गोपीनाथ मुंडेंची ताकद त्यांच्या पाठीशी होती. गोपीनाथ मुंडे यांच्याकडूनच राजकीय बाळकडू मिळाल्यामुळे पंंकजा यांना तसे राजकारण फार आव्हानात्मक ठरले नाही. त्याच अनुषंगानं यशश्री मुंडेंचीही राजकीय एन्ट्री फार खडतर नसणार आहे. कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची ताकद यशश्री यांच्या पाठीशी असणार आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळापासून कन्या पंकजा मुंडे या राजकारणात कार्यरत होत्या. तर प्रीतम यांना गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर अचानक राजकारणात अपरिहार्य कारणामुळे यावं लागलं. कोणतीही राजकीय तयारी नसताना, कुटुंबावर अचानक दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना प्रीतम या त्या पोटनिवडणुकीला सामोरे गेल्या होत्या.
आता दोघीही राजकारणात सक्रिय असून आता गोपीनाथ मुंडे यांची तिसरी मुलगी यशश्री मुंडेही राजकारणात नशीब आजमावण्यासाठी सरसावल्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांची लोकनेते म्हणून ख्याती होती. त्यांचं महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत एक राजकीय वजन होतं. महाराष्ट्रात भाजपची मुळे रोवण्यात मुंडेंचा वाटा मोठा आहे. इतक्या दिवस त्यांच्या दोन मुली पंकजा आणि प्रीतम यांच्याकडे गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिले जाते. आता यशश्री मुंडेंही राजकारणात आल्या आहेत.
गेली कित्येक दशकं मुंडे कुटुंबाचं वैद्यनाथ बँकेवर निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे बंधू भगिनी एकत्र आल्यामुळे बँकेची निवडणूक मुंडे कुटुंबियांसाठी फार अवघड नसणार आहे. पण यशश्री मुंडे या बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.
आत्तापर्यंत यशश्री मुंडे या राजकारणापासून अलिप्त होत्या.पण गेल्या दोन दसरा मेळाव्यात त्यांनीही हजेरी लावल्यामुळे त्यांच्या राजकीय एन्ट्रीच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर त्यांनी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करत राजकारणात पाऊल टाकलं आहे.
वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीच्या एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. येत्या 10 ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान होत असून 12 रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाणार आहे.
वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या लेकीचं जोरदार राजकीय लॉन्चिंग केलं जात असल्याची चर्चा बीडच्या राजकारणात आहे.
वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 14 जुलैला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर 15 ते 19 जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्यासाठीची अंतिम मुदत असणार आहे. यानंतर बँकेच्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.