

Dharashiv News : धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची तर उपाध्यक्षपदी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांची निवड झाली. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक झाल्यापासून धाराशिव झेडपीवर भाजपचा पहिल्यांदाच झेंडा फडकवण्यासाठी आमदार राणा पाटील यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन करीत राजकीय आक्रमकता दाखवली. त्यांनी सत्तेसाठी केलेला 'आटापीटा' हा त्यांच्या रणनीतीचा भाग राहिला आहे.
त्यासाठी त्यांनी सुरुवातीलाच सर्वसाधारण गटातील महिलांची उमेदवारी एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात टाकली. त्यानंतर काही भाजपमधील नेत्यांनाच शिंदे यांच्या शिवसेनेच्या 'एबी' फॉर्मचे वाटप केले. तर तेर गटातून उशीरा उमेदवारी जाहीर करीत विरोधकांना गाफील ठेवण्याचा प्लॅनही यशस्वी ठरला. त्यासोबतच निकालानंतरही शिंदे यांची शिवसेना दुसरीकडे जाऊ नये यासाठी तह करून सुरुवातीचे अध्यक्षपद पदरात पाडून घेतले.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवशीपासूनच त्यांनी भाजपकडे (BJP)अध्यक्षपद येईल यासाठी मोठे प्लॅनिंग केले होते. झेडपीचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने या गटावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. जिल्हा परिषदेच्या 55 गटांपैकी 28 गट महिलांसाठी आरक्षित होते. त्यामधील 16 गट हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होते. त्याठिकाणी महायुतीमध्ये भाजपकडे सहा गट घेतले. उर्वरित सहा गट शिंदेंच्या शिवसेनेला तर चार गट राष्ट्रवादी काँग्रेसला सोडले होते. त्यामध्ये भाजपच्या तीन महिला विजयी झाल्या. तेरमधून अर्चना पाटील तर केशेगाव मतदारसंघातून भाजपच्या सुमन भद्रे, कळंब तालुक्यातील डिकसळमधून पूजा शिंदे या दोन पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी विजयी झाल्या.
त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सर्वसाधारण महिला उमेदवार दोन ठिकाणी विजयी झाल्या. त्या भूम तालुक्यतील ईटमधून शुभांगी देशमुख, बलसूरमधून सविता बिराजदार विजयी झाल्या तर शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाच उमेदवार विजयी झाल्या. भूम तालुक्यातील सूकटामधून विजयमाला मरकड, आनाळा गटातून वैशाली डोके, जेवळी श्रुती पनुरे, कदेर उषा गायकवाड, कानेगाव सुवर्णा पाटील विजयी झाल्या तर विरोधी पक्षातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महिला उमेदवार आंबेजवळगा, माकणी तर काँग्रेसच्या जळकोट, कुन्हाळी तर समाजवादी पक्षाच्या मंगरूळ तर अपक्ष तुरोरी गटातुन महिला उमेदवार विजयी झाल्या. त्यामुळे भाजपने अर्धी लढाई येतेच जिंकली होती.
'एबी' फॉर्मचे हायजॅक राजकारण
निवडणुकीच्या सुरुवातीलाच राणा पाटलांनी शिंदेंच्या शिवसेनेला धक्का देत भाजपच्या काही इच्छुक उमेदवारांना शिवसेनेचे 'एबी' फॉर्म वाटले होते. त्यामुळे मित्रपक्षातून स्वपक्षीय कार्यकर्त्यांना संधी देत त्यांच्या पक्षातही निवडणुकीपूर्वीच वर्चस्व निर्माण केले होते. ज्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. धाराशिवमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या झेंडावंदनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या समोरच संपर्कप्रमुख राजन साळवी यांना एबी फॉर्म आमदार राणा पाटील व त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांना दिल्याबद्दल जाब विचारला होता.
यावेळी शिवसेना नेते अजित पिंगळे यांना मॅनेज करून हे एबी फॉर्म वाट्ल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यामुळे वातावरण तापले होते. त्यासोबतच राणा पाटील यांनी त्यांचे समर्थक नेताजी जाधव यांना पळसपमधून उमेदवारी दिली होती. मात्र, याठिकाणचे इच्छुक अजित लाकाळ व अविनाश खापे यांनी शिवसेना भाजपच्या दावणीला बांधली असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे जाधव यांच्याऐवजी ऐनवेळी लाकाळ यांना याठिकाणी उमेदवारी दिली होती. त्यावेळी राणा पाटील यांनी त्यांचे दोन समर्थक ऐनवेळी शिवसेनेत पाठवून त्यांना निवडून आणले होते. या माध्यमातून त्यांचा दुसरा डाव देखील यशस्वी झाला होता.
त्याशिवाय तेर गटातून त्यांनी त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची उमेदवारी शेवटच्या दिवशी उमदेवारी जाहीर केली. सुरवातीला त्या निवडणूक लढणार नसल्याची घोषणा त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी केली होती. मात्र, अचानक त्या ठिकाणी इच्छुक असलेल्या भाजपच्या जया नायकवाडी यांना भाजपचा 'एबी' फॉर्म न देता अर्चना पाटील यांना दिला. त्यामुळे नायकवाडी यांचा फॉर्म याठिकाणी अपक्ष ठरला. त्यामुळे जया नायकवाडी यांना झेडपीची उमेदवारी काढून घेतल्याची बक्षिसी म्हणून त्याच पंचायत समिती गणातून अपक्ष म्हणून निवडून आणले. विरोधकांना गाफील ठेवण्याचा त्यांचा हा तिसरा डावदेखील यशस्वी झाला.
त्रिशंकू स्थितीत 'फोडाफोडी'चे राजकारण
जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीला बहुमत मिळाले. भाजप मोठा पक्ष ठरला. मात्र त्यांना राष्ट्रवादी व शिंदेंच्या शिवसेनेच्या पाठिब्यांची आवश्यकता होती. धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपचे 19, एकनाथ शिंदे शिवसेनेचे 15, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 6, अपक्ष व इतर पक्षाचे 5 असे एकूण 45 सदस्य महायुतीच्या बाजूने होते. तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे 7, काँग्रेस 3 असे 10 महाविकास आघाडीचे संख्याबळ होते. त्यामुळे महायुतीमधील भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेने वेगवेगळी जुळणी केली होती. मात्र, या 'फोडाफोडी'त तेच यशस्वी ठरले.
आमदार तानाजी सावंत गटाने सुरुवातीला भाजप आमदार राणा पाटील यांच्यासोबत सत्तास्थापन करण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे सावंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत जवळीक ठेऊन सत्तास्थापन करणार का? याबाबत उत्सुकता लागली होती. मात्र, तेंव्हा जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तेव्हा राणा पाटलांनी निर्णायक खेळी केली. त्यांनी केवळ भाजपचेच नव्हे, तर शिंदे शिवसेनेचा एक बंडखोर आणि ठाकरे गटाचा एक अपक्ष बंडखोर आपल्या गोटात खेचून विरोधकांना चित केले होते.
झेडपी सदस्यांचे 'कोकण' पर्यटन
सत्तेचे गणित जुळवण्यासाठी आणि सदस्य फुटू नयेत यासाठी राणा पाटलांनी महायुतीच्या सुमारे 31 उमेदवारांना कोकणात सहलीला पाठवले होते. मतमोजणी झाल्यानंतर काही तासातच हे सदस्य सहलीवर पाठवले. स्वतः राणा पाटील आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी तिथे जाऊन या सदस्यांची भेट घेतली आणि त्यांची 'फिल्डिंग' लावून धरली. विशेषतः या ३१ सदस्यात शिंदेंच्या शिवसेनेचे दोघे सदस्य होते. त्यामुळे ऐनवेळी शिंदे शिवसेनेने गडबड केली तर दोन सदस्यसोबत ठेवत त्यांनी हातचा राखून ठेवला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेत सत्तास्थापन करताना शिवसेनेला सोबत घेण्याचे आश्वासन दिले. भाजप मोठा पक्ष असल्याने पाठींबा देण्यासाठी त्यांनी हायकमांडकडून प्रयत्न करीत तानाजी सावंत यांचा विरोध थंड बस्त्यात गुंडाळला.
अंतर्गत विरोध मोडीत काढला
महायुतीमध्ये असतानाही तानाजी सावंत आणि राणा पाटील यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू होती. सावंतांनी 'अडीच-अडीच' वर्षांचा फॉर्म्युला सुचवला होता, मात्र राणा पाटलांनी आपल्या राजकीय वजनाचा वापर करून भाजपच्या अर्चना पाटील यांना अध्यक्षपदी बसवण्यात यश मिळवले आहे. शिवसेनेकडून 'अडीच-अडीच' वर्षांचा ठरला असल्याचे सांगितले जात असले तरी सुरुवातीचे अध्यक्षपद भाजपकडे खेचून आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.