

Parbhani Hingoli MLC Election: परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे शिवसेना महायुतीचे सईद खान हे पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवत विजयी झाले आहेत.
महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीन पक्षांची मिळून ३०० हून अधिक मते असताना सईद खान यांना मात्र २४२ मतेच पडली. अपक्ष सुशील देशमुख यांच्या खात्यात ५६ मते गेल्याने महायुतीत फूट पडल्याचे दिसून आले आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सईद खान यांच्या उमेदवारीवरून नाराजी होती. ती मतदानातून काही प्रमाणात बाहेर आल्याचे दिसून आले आहे.
संख्याबळाच्या दृष्टीने परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा १३१ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी आमदार राजेश विटेकर व इतर स्थानिक नेत्यांनी प्रयत्नही केले.
मात्र २०१८ मध्ये ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी या जागेसाठी आग्रह धरला. जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची जागा भाजपला दिल्यामुळे शिंदे यांच्या परभणी वरील दाव्याला मान्यता देण्यात आल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी सईद खान या अल्पसंख्यांक चेहऱ्याला उमेदवारी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पावलावर पाऊल ठेवल्याची चर्चा या मतदारसंघात होती.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने परभणी महापालिकेत मुस्लिम महापौर केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेसाठी सईद खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर पुरवणीचा यशस्वी प्रयोग केला.
गेल्या काही वर्षापासून परभणी जिल्ह्यात सईद खान यांनी शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवली. पाथरी नगरपरिषदेत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या ३५ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत सत्ता मिळवली. याचे बक्षीस म्हणून सईद खान यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जाते.
सईद खान यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली शक्ती पणाला लावली होती. खान यांच्या उमेदवारीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसू नये याची काळजी घेत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यामार्फत नाराजांना शांत केले.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी महायुतीचे उमेदवार सईद खान यांनाच आपले मत देण्याचा व्हीप देखील काढला. सईद खान हे पहिल्या पसंतीतच विजयी होतील इतकी महायुतीची मते त्यांना मिळाली मात्र ३०० च्या जवळपास संख्याबळ असताना अपक्ष सुशील देशमुख यांनी महायुतीची पन्नासहून अधिक मते फोडल्याचा अंदाज आहे.
ही बहुतांश मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असल्याचे बोलले जाते. आमदार राजेश विटेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना महायुतीचे सईद खान यांनाच मत देण्याचे आदेश दिले असले तरी त्यात फूट पडल्याचे स्पष्ट होते. याची राजकीय पडसाद परभणी मध्ये पुढील काळात उमटू शकतात.
सईद खान यांना २४२ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते मिळाली. अपक्ष सुशील देशमुख यांना ५६ मते मिळाली आहेत. तर आठ मते बाद झाली आहेत.
सईद खान यांनी महायुतीचे मतदार एकत्र ठेवण्यासाठी बरीच शक्ती खर्च केली असे असताना मते फुटल्यामुळे शिवसेनेला काहीसा हा धक्का समजला जात आहे. दुसरीकडे परभणीचे खासदार संजय जाधव हे ऑपरेशन टायगरमध्ये सहभागी होत शिवसेनेत दाखल झाल्याचा फटका विवेक नावंदर यांना बसल्याचे दिसून आले आहे.
सईद खान यांच्या उमेदवारीनंतर भाजपमध्येही काहीसे नाराजीचे वातावरण होते परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना सूचना देत महायुतीचे पालन करा असे स्पष्ट सांगितले होते.
त्यानंतर मेघना बोर्डीकर यांनी नाराज नगरसेवकांची मनधरणी करत भाजपची मतं फुटणार नाही याची काळजी घेतली. सईद खान यांच्या विजयाने परभणी जिल्ह्यात शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.