

Chhatrapati Sambhajinagar : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आणि विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे. आधी वाढत्या अपघातांमुळे समृद्धी महामार्ग बदनाम झाला, आता या मार्गावर दरोडे, लुटमारीचे प्रकार वाढल्यामुळे वाहतुकीसाठी व सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी तो किती सुरक्षित आहे? असा प्रश्न वाढत्या दरोड्यांच्या घटनांमुळे उपस्थित केला जात आहे. दरोडेखोरांनी आता थेट सरकारी वाहनेच लक्ष्य केल्याचे कालच्या प्रकारांवरून दिसून आले आहे.
काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर प्रवासी वाहनांवर दरोडा टाकण्यात आला होता. महिला-पुरूषांना मारहाण करत दागिने, रोख रक्कम लुटण्याच्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलीसांकडून तात्काळ कारवाई करून आरोपींना बेड्या ठोकल्या जात असल्या तरी लुटीचे प्रकार थांबत नाहीयेत. यावेळी दरोडेखोरांनी सरकारी वाहनावरच तुफान दगडफेक करत लुटण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती संभाजीनगरजवळील सावंगी परिसरात (चॅनेल क्रमांक ४२६) अज्ञात व्यक्तींनी थेट महाराष्ट्र शासनाच्या वाहनावर दगडफेक केली. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कार्यालय अधीक्षक हिंमत राठोड हे समृद्धी महामार्गावरून प्रवास करतानाच त्यांच्या वाहनावर अचानक दगडफेक झाली. यात वाहनाची समोरील काच फुटली. सुदैवाने गाडीतील पाचही जण या घटनेतून सुखरूप बचावले.
कार्यालय अधीक्षक हिंमत राठोड हे आपल्या सहकाऱ्यांसह वाशिम येथून महत्त्वाची शासकीय कागदपत्रे घेऊन पुण्याला बैठकीसाठी निघाले होते. प्रवासादरम्यान छत्रपती संभाजीनगरजवळील सावंगी परिसरात चॅनेल क्रमांक ४२६ जवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. अचानक झालेल्या या हल्ल्यात वाहनाच्या समोरील काचेचे नुकसान झाले. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि वाहनातील पाचही प्रवासी सुखरूप राहिले.
या घटनेनंतर राठोड यांनी पोलीस (Police) प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. घटनेनंतर महामार्ग पोलिसांचे पथक २० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या ११२ क्रमांकावर तीन वेळा फोन करूनही कोणतीही मदत मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. तब्बल दोन तास घटनास्थळी प्रतीक्षा करूनही संबंधित पोलिसांचे पथक मदतीसाठी पोहोचले नसल्याचे राठोड यांनी सांगितले.
अखेर पुढील तक्रार नोंदवण्याबाबत आवश्यक सूचना मिळाल्यानंतर ते शासकीय बैठकीसाठी पुण्याच्या दिशेने रवाना झाले. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
सहा महिन्यात लुटमारीच्या पाच घटना..
गेल्या सहा महिन्यातच या मार्गावर लूटमारीच्या पाच प्रमुख घटना घडल्या आहेत. यात १२ मे २०२६ रोजी वैजापूर हद्दीत कार अडवून प्रवाशांना लुटण्यात आले होते. २८ जुलै रोजी सिंदखेडराजा परिसरात टायर पंक्चर करून वाहनातील रोकड लंपास केल्याची घटना समोर आली. १५ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर हद्दीत चाकूचा धाक दाखवून लूटमार करण्यात आली. तर २७-२८ऑगस्टच्या दरम्यान, सिन्नरजवळ खिळे टाकून वाहनांचे टायर पंक्चर करण्यात आले होते. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या वकिलाच्या कुटुंबाला मारहाण करून सुमारे १८ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज लुटला. २ नोव्हेंबर रोजी शहापूरजवळ जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची कार अडवून पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत लूटमार करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.