Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांचा राऊतांवर पलटवार; 'माझी जात तुम्हाला खुपतेयं का? आरोप नको, पुरावे द्या' म्हणत दिले आव्हान!

Sanjay Shirsat Hits Back at Sanjay Raut Over Bribery Claims : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर उदगीरमधील अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटरच्या २५ कोटी रुपयांच्या प्रस्तावासाठी ५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे.
Anna Bhau Sathe Training Centre Latur controversy; Sanjay Raut And Sanjay Shirsat
Anna Bhau Sathe Training Centre Latur controversy; Sanjay Raut And Sanjay ShirsatSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena : अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त समजतात. सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी जे काम करतोय, ते बघा. मी कधी जातीवर जात नाही, पण तुम्हाला माझी जात खुपतेयं का? असा सवाल सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर केला. माझ्यावर पंचवीस कोटींच्या प्रस्तावासाठी पाच कोटी घेतल्याचा आरोप करताय, पुरावे असल्याचा दावा करताय, तर मग ते द्या, असे खुले आव्हानही शिरसाट यांनी राऊत यांना दिले.

सामाजिक न्याय विभागाचा पैसा हा सर्वसामान्यांचा पैसा आहे. एक ते पाच लाख रुपयांचे कर्ज मागणाऱ्या तरुणांचे तीस हजार अर्ज माझ्याकडे प्रलंबित आहेत. केंद्र सरकारकडून पैसा न आल्यामुळे मी त्यांना हे कर्ज देऊ शकलेलो नाही. मग एखाद्याचा पंचवीस कोटी रुपयांचा प्रस्ताव कसा मंजूर करायचा? सरकारचा पैसा उधळण्यासाठी नाही, असे सांगत संजय शिरसाट यांनी संजय राऊत आणि नरसिंग उदगीरकर यांनी केलेले आरोप फेटाळले. नरसिंग उदगीरकर या माणसाला मी ओळखत नाही, त्याला कधी पाहिलेले नाही, असेही ते म्हणाले.

मग डील आणि पाच कोटी रुपये मागण्याचा प्रश्न येतो कुठे? आरोप करणाऱ्यांनी थोडी माहिती घ्यायला हवी होती. पंचवीस कोटींचे कुठलेही काम किंवा प्रस्ताव मी मंजूर केलेला नाही. अण्णाभाऊ साठे यांचे नाव लेटरहेडवर लावून या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला माझी जात खुपते आहे का? तुमच्या आधीच्या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये आणि त्याआधी 1995 मध्ये सत्ता आली तेव्हाच्या मंत्रिमंडळात एक तरी दलित समाजाचा मंत्री तुम्ही केला होता का? एखादे नाव सांगा, असे आव्हानही संजय शिरसाट यांनी दिले.

Anna Bhau Sathe Training Centre Latur controversy; Sanjay Raut And Sanjay Shirsat
Sanjay Shirsat: मंत्री संजय शिरसाटांसमोर नवं संकट, ठाकरेंच्या 'फायर ब्रँड' नेत्यानं साधलं परफेक्ट टायमिंग; संभाजीनगरमध्येच फोडला नवा बॉम्ब

लातूरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. या संस्थेचा प्रस्ताव सादर करणारे नरसिंग उदगीरकर यांना माध्यमांसमोर आणत राऊत यांनी हे आरोप केले. त्याला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन संजय शिरसाट यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी मातोश्रीवरही गंभीर आरोप केले.

मी गेल्या दोन वर्षांत 25 कोटींचा एक तरी प्रस्ताव मंजूर केल्याचे दाखवा. मला मंत्री म्हणून 10 कोटींच्या वरचा प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार नाही. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागते. ही माहिती देखील आरोप करणाऱ्या महाशयांना माहीत नाही, असा टोला शिरसाट यांनी लगावला.

आतापर्यंत मी संजय राऊत यांच्या विरोधात बोलत होतो. त्यावर राऊतांनी कधी तोंड उघडले नाही. पण मागची एक-दोन प्रकरणं पाहिल्यावर राऊत यांना वाटलं, चांगला चान्स आहे. त्यामुळेच त्यांनी माझ्यावर आरोप केले. उदगीरकर नावाच्या गृहस्थाने 25 कोटींचा प्रस्ताव दिला होता. अनेक प्रस्ताव माझ्याकडे येत असतात. अनेक प्रस्ताव फेटाळले जातात, तर काहींना मंजुरी दिली जाते. हा माझ्या विभागाच्या कामाचा भाग आहे.

पण राऊतांनी त्याचा थेट संबंध साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याशी लावला. अण्णाभाऊ साठेंचं योगदान मला माहीत आहे का? असा जावई शोधही त्यांनी लावला. त्या प्रकरणाशी अण्णाभाऊ साठेंचा संबंध काय? लेटरहेडवर महापुरुषांचं नाव लावायचं आणि काम नाही झालं तर बदनाम करायचं, असा प्रकार सुरू आहे, असेही संजय शिरसाट म्हणाले.

ठाकरेंनी अण्णाभाऊ साठेंना कधी हार घातला का?

तुम्ही अण्णाभाऊ साठेंचे नाव घेता. तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी कधी अण्णाभाऊ साठेंच्या फोटोला हार घातला का? हार घातल्याचा एखादा फोटो दाखवू शकता का? आम्हाला या भानगडीत तुम्ही खेचू शकत नाही. अण्णाभाऊ साठे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. वाटेगावात जाऊन पाहा, इतिहासात कुणी एवढा मोठा पुतळा बसवला नसेल. एवढा मोठा पुतळा बसवण्यात येणार आहे. त्यासाठी 50 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पाच एकरांत त्यांचं मोठं स्मारक करत आहोत. आम्हाला अण्णाभाऊ सांगता? महाडला जाऊन बघा. चवदार तळ्याचं सुशोभीकरण करतोय, त्यासाठी 90 कोटी खर्च करतोय. डोळे उघडे ठेवा. फोटोचा वापर केवळ राजकारणासाठी करू नका. मजबुरी म्हणून तुम्हाला फोटो ठेवावा लागतो, असा थेट हल्ला शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर चढवला.

'बरं झालं उद्धव ठाकरेंनी यांना मंत्री केलं नाही,' असं राऊत म्हणाले होते. राऊत यांच्या या विधानावर उत्तर देताना शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरेंना हे माहीत होतं की, आमच्याकडे पैसे नाहीत, म्हणूनच आम्हाला मंत्री केले नाही. अपक्ष आमदार शंकर गडाख यांचा पक्षाशी संबंध नव्हता, त्यांना एका दिवसात कॅबिनेट मंत्री करण्यात आले. त्यांचे पक्षासाठी असे कोणते योगदान होते? आपली चांडाळ चौकडी कशी मंत्रिमंडळात येईल, हेच उद्धव ठाकरेंनी पाहिले, असा आरोप शिरसाट यांनी केला.

Anna Bhau Sathe Training Centre Latur controversy; Sanjay Raut And Sanjay Shirsat
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभे राहणार! जागेसाठी मुख्यमंत्री सम्राट चौधरींना मंत्री संजय शिरसाटांचे पत्र

अनिल परब, सुभाष देसाई यांना मंत्रिमंडळात घेतले. मलिदा कसा खायचा, हेच लक्ष्य होते. मातोश्रीचा मागचा दरवाजा कशासाठी होता? हे सांगायला लावू नका. मागच्या दारातून कसे टेम्पो आत यायचे? आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करता? एक तर आमच्याकडे पैसा नाही. दुसरी आमची जात आडवी येते, असे म्हणत शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.