

Sanjay Shirsat News : महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो बौद्ध अनुयायी आणि पर्यटक बिहारमधील बोधगयेला भेट देतात. त्यामुळे महाराष्ट्रातील भाविकांच्या निवासाची, भोजनाची आणि इतर सुविधांची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र भवन उभारण्याची आवश्यकता असून त्यासाठी बोधगया येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी ८ ते १० एकर जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात शिरसाट यांनी चौधरी यांना एक निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, बोधगयेत महाराष्ट्र भवन उभारल्यास महाराष्ट्र भवनामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांना निवास आणि अन्य सुविधा उपलब्ध होतील. त्याचबरोबर बिहार आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीलाही चालना मिळेल. या महाराष्ट्र भवनाच्या बांधकामाचा, विकासाचा आणि देखभालीचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार करणार असल्याची ग्वाहीही शिरसाट यांनी दिली आहे.
बोधगया हे भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी, भाविक आणि पर्यटक येथे भेट देतात. विशेषतः मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना बोधगया दर्शनासाठी नेले जात असल्याने त्यांच्या निवासाची आणि इतर सुविधांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भवन उभारण्याचा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे.
विशेष म्हणजे, बोधगया येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी कायमस्वरूपी निवासव्यवस्था उभारण्याचा विचार अचानक पुढे आलेला नाही. जुलै २०२६ मध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया येथे विशेष रेल्वेने यात्रेकरूंना रवाना करताना संजय शिरसाट यांनी या प्रस्तावाची माहिती दिली होती.त्यावेळी बोधगया येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी निवास आणि अन्य सुविधा उभारण्यासाठी सुमारे १० एकर जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते.
या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिकांना तसेच महाराष्ट्रातून येणाऱ्या इतर भाविकांना निवासाची कायमस्वरूपी सोय उपलब्ध होऊ शकते.बोधगया हे बौद्ध धर्मीयांचे जगभरातील सर्वांत महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. याच ठिकाणी बोधिवृक्षाखाली भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, अशी बौद्ध धर्मीयांची श्रद्धा आहे.येथील महाबोधी महाविहार हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे.
महाराष्ट्राचा बौद्ध धर्माशी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्म स्वीकारानंतर महाराष्ट्रातून बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने बोधगया येथे दर्शनासाठी जातात. नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, लातूर, बीड यांसह राज्यातील विविध भागांतून भाविक येथे पोहोचतात.त्यामुळे बोधगया येथे महाराष्ट्राचे स्वतंत्र भवन उभारल्यास त्याचा लाभ केवळ तीर्थयात्रा योजनेतील लाभार्थ्यांनाच नव्हे, तर स्वतंत्रपणे प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायांनाही होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.